Showing posts with label भाषांतर. Show all posts
Showing posts with label भाषांतर. Show all posts

Thursday, March 24, 2016

कुपात्री दान?

दात्याने दान कोणाला द्यावे हा त्याचा वैयक्तिक प्रश्न असला तरीही ते दान सत्पात्री असावे अशी एक अपेक्षा आपल्या संस्कृतीत केली गेली आहे. आता सत्पात्री किंवा कुपात्री याचक कोण हे ठरवणारी कुठलीही अधिकृत संस्था किंवा प्रणाली अस्तित्वात नसल्याने बहुतेकवेळा दात्याच्या बौद्धिक आणि मानसिक कुवतीनुसारच याचकाला सत्पात्री अथवा कुपात्री ठरवल्या जाण्याची शक्यता अधिक असते.

दानाच्या महतीबरोबरच वादांचे महत्त्वही वादे वादे जायते तत्त्वबोध: म्हणून प्रतिपादित केल्या गेले आहे. भारतात अनादिकाळापासून सुरु असणाऱ्या सततच्या वैचारिक मंथनांमुळे ‘वाद’ हा शब्द आपणांस सुपरिचित आहे. परस्परविरोधी तात्विक विचारसरणींमधून निर्माण झालेल्या या वादांमुळे प्रत्येक विचारसरणीतील योग्य-अयोग्य, चांगल्या-वाईट बाबी कालानुरूप समाजासमोर येत गेल्या व त्यातून समाजाची वैचारिक श्रीमंती कमी जास्त होत गेली. पूर्वपक्ष व उत्तरपक्ष यांद्वारे वादांची समीक्षा आणि विवाद करण्याची परंपरा आता लुप्त होत असतानाही नवीन वाद निर्माण होणे थांबले नाहीत किंबहुना यापुढेही थांबणार नाहीत कारण वैचारिक वादविवाद हे सामाजिक जिवंततेचे एक लक्षण आहे.


डावीकडून रोहन मूर्ती व शेल्डन पोलॉक
वैयक्तिक देणगीतून उद्भवलेला असाच एक वैचारिक वाद ‘मूर्ती क्लासिकल लायब्ररी ऑफ इंडिया’ (Murty Classical Library of India) या उपक्रमाच्या निमित्ताने पुढे आला आहे. पारंपरिक विद्वत्ता विरुद्ध अपारंपरिक विद्वत्ता असे या वादाचे स्वरूप आहे. अमेरिकेतल्या कोलंबिया विद्यापीठातील भारतीय संस्कृतीचे (Indology) अभ्यासक व प्रसिद्ध संस्कृत पंडित डॉ. शेल्डन पोलॉक यांच्या प्रमुख संपादनाखाली भारतातील विविध भाषांमधील सुमारे ५०० प्राचीन ग्रंथांचा इंग्रजीत भाषांतर करण्याचा हा उपक्रम रोहन मूर्ती (नारायण मूर्तींचे चिरंजीव) यांच्या संकल्पनेतून व आर्थिक पाठबळातून साकार होणार आहे. प्रथमदर्शनी या उपक्रमाबद्दल कोणाच्याही मनात शंका उद्भवण्याचे कारण नाही किंबहुना एका पाशात्त्य विद्वानाच्या देखरेखीखाली आपल्या प्राचीन ग्रंथांचा अभ्यास केला जातोय हे पाहून नेहमीप्रमाणे आपले भारतीय मन सुखावण्याची शक्यताच अधिक!

रोहन मूर्ती यांनी त्यांच्याजवळील संपत्तीचा व्यय कसा करावा हा सर्वस्वी त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यात इतरांनी नाक खुपसण्याचे काही कारण नाही. परंतु प्राचीन भारतीय ग्रंथ हे आपणा सर्वांचे वैभव आहे, आपल्या संस्कृतीचे ते अविभाज्य घटक आहेत. त्यामुळे त्यांच्या भाषांतराची प्रक्रिया ही केवळ मूर्ती परिवार आणि काही पाशात्त्य विद्वान यांच्यापुरतीच मर्यादित राहून केवळ काही विशिष्ट हेतूने प्रेरित, विशिष्ट लोकांना अभिप्रेत असे या ग्रंथांचे भाषांतर केल्या जाऊ नये तर त्यात भारतीय पारंपरिक विचारांनाही स्थान देण्यात यावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे आणि त्यातूनच वरील वाद उद्भवला आहे. वरकरणी अत्यंत स्तुत्य भासणाऱ्या या उपक्रमाचे स्वागत न होण्यामागचे मुख्य कारण आहे, डॉ. शेल्डन पोलॉक यांची संस्कृत भाषा व भारतीय संस्कृतीबद्दलची मते आणि त्यायोगे त्यांनी काढलेले  काही निष्कर्ष -

१)   हिंदू राजे आणि प्रांतीय भाषांमुळे संस्कृत बाराव्या शतकाच्या आसपासच मृत झाली असून मुस्लीम राजांनी तिच्या पुनरुज्जीवनाचे प्रयत्न केले
२)   भारतीय उपखंडात संस्कृतचा प्रसार ब्राह्मण-राजसत्ता यांच्या एकत्र येण्यामुळे झाला
३)   संस्कृतच्या प्रभावाखाली राहावे लागत असल्याने संस्कृत आणि इतर भारतीय भाषांमध्ये तेढ निर्माण झाली
४)   संस्कृतात ‘उपजतच’ असलेल्या वंशवाद, वर्चस्ववाद आणि शोषणमूल्यांनी प्रेरित होऊन जर्मनीत नाझीवादाचा उगम झाला
५)   संस्कृतातल्या मौखिक परंपरेला आणि त्याद्वारे विकसित झालेल्या वेद, शास्त्र इत्यादींना महत्व देण्याचे कारण नाही
६)   वेदांतील कर्मकांड, यज्ञ, मंत्र इ. ब्राह्मण वर्चस्ववादाचे पुरावे आहेत
७)   वेद (परमार्थिक) आणि काव्य (व्यावहारिक) हे परस्परभिन्न असून काव्य लिखित स्वरूपात असल्याने त्यांचा अभ्यास करून त्यातील शोषणमूल्ये काढून टाकली पाहिजेत
८)   संस्कृतात लिखाणाची सुरुवात बौद्ध धर्मास प्रत्युत्तर म्हणून झाली
९)   रामायण ही बुद्धोत्तरकालीन निर्मिती असून त्याचा वापर आजतागायत हिंदूंचे मुस्लिमांवरील आक्रमण वैध ठरवण्यासाठी केला जातो
१०)   राजांना देवत्व प्राप्त करवून देण्यासाठी राजाश्रयाखाली राहणाऱ्या ब्राह्मणांनी ‘सत्तेच्या सौंदर्यीकरणा’द्वारे (aestheticization of power) विविध संस्कृत ग्रंथ रचले इ.

The Battle for Sanskrit या पुस्तकाचे मुखपृष्ठ
भारतीय पारंपरिक विचारसरणीत बसत नसल्याचे सोपे कारण देऊन वरील निष्कर्ष दुर्लक्षून चालणार नाहीत कारण ती अभ्यासाअंती काढलेली आहेत. प्रथम ग्रीक आणि लॅटिन भाषांचा अभ्यास केलेल्या पोलॉक यांनी उर्वरित आयुष्य संस्कृत व भारतीय संस्कृतीच्या अभ्यासासाठी वाहून घेतले आहे. संस्कृत भाषेवरचे त्यांचे प्रभुत्त्व वादातीत आहे आणि त्यामुळेच त्यांच्या विचारांना प्रतिवाद करणेही आवश्यक ठरते. संस्कृतभारतीचे चमू कृष्ण शास्त्री, के.एस.कन्नन यांनी याची सुरुवात केली. J. Hanneder यांचा ‘On “The Death of Sanskrit”’ हा निबंधही या संदर्भात वाचण्यासारखा आहे. राजीव मल्होत्रा यांचे ‘The Battle for Sanskrit’ हे पुस्तक हार्पर कॉलिन्स या प्रकाशन संस्थेने नुकतेच प्रकाशित केले आहे ज्यात त्यांनी पोलॉक यांच्या विचारांचे अभ्यासपूर्ण वैचारिक खंडन केले आहे. या पुस्तकाच्या उपशीर्षकातूनच (Is Sanskrit political or scared? Opressive or liberating? Dead or alive?) उद्धृत विषयाचा परीघ लक्षात येतो. जिज्ञासूंनी हे पुस्तक जरूर वाचावे. हा लेख लिहण्यामागची प्रेरणा सुद्धा हेच पुस्तक आहे.

पोलॉक यांच्या विरोधामागे आणखी एक प्रबळ कारण आहे ते भारताविषयक त्यांनी वेळोवेळी व्यक्त केलेली खंबीर राजकीय मते. काँग्रेसचे सरकार असताना नरेंद्र मोदी विरोधात आणि आता भारत सरकारच्या एकंदरीत कार्यपद्धतीविरुद्ध (जेएनयु प्रकरणासहित) आजवर किमान पाच आणि तत्सम पंधरा ‘इंटरनेट अर्जां’वर (online petitions) स्वाक्षरी करणाऱ्या पोलॉक यांचा काँग्रेसप्रणित युपीए सरकारने २०१० साली ‘पद्मश्री’ देऊन ‘यथोचित’ गौरव केलेला आहेच. अभ्यासकांना राजकीय मते असण्यात काही गैर नाही. परंतु तात्कालिक घटनांचा आपल्या राजकीय विचारांशी सुसंगत असा सोयीचा अर्थ लावून आपले निष्कर्ष कसे बरोबर आहेत हे पटवून देणे अभ्यासकाच्या भूमिकेला साजेसे नाही. रामायणाची ऐतिहासिकता नाकारतानाच त्यात उद्धृत खगोलीय घटनांकडे संपूर्ण दुर्लक्ष करणे व राम रावणातील युद्धाचा संदर्भ देत बाबरी प्रकरण, भारतात मुस्लिमांवर होणारे हल्ले, अत्याचार रामायणावरून प्रेरित आहेत असे म्हणणे त्यामुळेच अयोग्य आहे.

प्राचीन भारतीय परंपरेचा आधिदैविक, आधिभौतिक आणि आध्यात्मिक असा विचार न करता दैविक आणि आध्यात्मिक अंगांना तसेच शास्त्रांना ‘समस्या’ म्हणून वगळणे, यज्ञ, मंत्र आणि मौखिक परंपरेचे महत्व आणि जमल्यास अस्तित्वच अमान्य करणे  अशा विचारसरणीतून होणारे संस्कृत ग्रंथांचे इंग्रजी भाषांतर कितपत योग्य मानावे हा प्रश्न आहे. वेदांतील सूक्ते, उपनिषदांतील शांतीमंत्रे, पातंजल योगसूत्रे, सौंदर्यलहरी यांचे भाषांतर होणार की नाही ते माहित नाही परंतु मंत्रांचे मूळ उच्चारात असल्यामुळे त्यांच्या भाषांतरातून अर्थवजा माहितीपेक्षा अधिक काही मिळण्याची अपेक्षा नाही.

मूर्ती क्लासिकल लायब्ररीची काही पुस्तके
ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीच्या स्थापनेनंतर काही वर्षांतच विशिष्ट ध्येय ठेवून पौर्वात्य अभ्यासाच्या (Oriental studies) च्या नावाखाली युरोपीय दृष्टीकोनातून भारतीय संस्कृतीच्या अभ्यासाची सुरुवात झाली. सर विलियम जोन्स या कायदेपंडित अभ्यासकाने ‘देवभाषे’ऐवजी ‘भाषा’ व ‘देवनागरी’ऐवजी ‘नागरी’ असे शब्द प्रचलित करण्यास सुरुवात केली. पुढे मॅक्समुल्लर वगैरे विद्वानांनी आर्य-द्रविडवाद अलगदपणे आणला आणि आर्यांना 'बाहेरून आलेले' ठरवण्यात आले. दुर्दैवाने बऱ्याच भारतीय अभ्यासकांनीही हेच मत प्रतिपादले. लोकमान्य टिळकांच्या The Arctic Home in the Vedas, राहुल सांकृत्यायन यांच्या ‘वोल्गा ते गंगा’ किंवा अलीकडचे डॉ. अमर्त्य सेन यांच्या The Argumentative Indian सारख्या पुस्तकांतून हीच बाब अधोरेखित होते. याचाच परिपाक संस्कृत भाषेला आर्यभाषा म्हणून परदेशी भाषा ठरवण्यात झाला. अर्थात हा वाद आजही जिवंत असून आर्य हे भारतीयच होते अशा आशयाचे नवीन पुरावे, DNA reports आता उपलब्ध आहेत. 

संस्कृत ही भारतीय भाषांची जननी किंवा मोठी बहिण नसून त्यांच्यात प्रचंड तेढ होती. ब्राह्मण- राजसत्तेच्या वरदहस्तामुळेच संस्कृतने इतर भारतीय भाषांवर प्रभुत्व गाजवले व त्यांना विकसित होण्याची पुरेशी संधी दिली नाही असा पोलॉक, त्यांचे विद्यार्थी व यांना मानणाऱ्या गटाचा आक्षेप आहे त्यामुळेच कदाचित मूर्ती क्लासिकल लायब्ररीद्वारे प्रादेशिक भारतीय भाषांतील पुस्तकांना अधिक महत्व देण्यात येत आहे. आतापर्यंत अशी नऊ पुस्तके भाषांतरित झाली आहेत. परंतु भाषांतरकारांचा एकूण दृष्टीकोन लक्षात घेता त्यांना सर्वच भारतीय भाषांत आढळणारे संस्कृतोद्भव शब्द (संस्कृत की तमिळ हा वाद लक्षात घेऊनही) त्यांच्या सुयोग्य अर्थाने इंग्रजीत आणणे जड जाईल असे दिसते. उदाहरणार्थ धर्म = religion, ईश्वर = God, आत्मन = soul, देवमुर्ती = idol, शक्ती = Holy Spirit, यज्ञ = sacrifice, शिव = destroyer, माया = illusion, मिथ्या = spurious, मोक्ष = salvation इ. भाषांतर सध्या प्रचलित असले तरी ते सुयोग्य नाहीत. नुकत्याच एका तेलुगु वाचकाने मूर्ती क्लासिकल लायब्ररीद्वारे तेलुगुतून इंग्रजीत भाषांतरित करण्यात आलेल्या ‘मनुचरित्र’ (The Story of Manu) या पुस्तकातील काही दोष दाखवून दिले आहेत. या वाचकाच्या मते कित्येक वाक्प्रचारांना सोयीने वगळण्यात आले आहे किंवा त्यांचा चुकीचा अर्थ लावण्यात आला आहे. ब्रह्मदेव = The Supreme God किंवा The God Creator, घोर वनप्रदेश = God forsaken place तसेच इतर काही तेलुगु शब्द चुकीचे भाषांतरित करण्यात आले आहेत असे त्यांचे म्हणणे आहे. एकंदरीतच हे भाषांतराचे काम ‘भारतीय भाषा’ ते ‘इंग्रजी’ असे शब्दकोश पुढे ठेवून केल्या जाणाऱ्या भाषांतरापेक्षा वेगळे न ठरल्यास त्यात आश्चर्य नाही.

सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास पोलॉक यांच्या मुख्य संपादनाखाली झालेले हे भाषांतर म्हणजे सत्यनारायणाच्या पोथीवर अजिबात विश्वास नसणाऱ्यांनी स्वत: सत्यनारायण करून गावजेवण घालण्यासारखे आहे. आपल्याकडे रामायणाला इजिप्तमध्ये नेऊन बसवणारे, प्रत्येक ऐतिहासिक ग्रंथ व त्यातील पात्रांना ‘myth’ च्या धुक्यात लपेटणारे, महाभारतातील युद्ध हा शैव-वैष्णव यांतील संग्राम मानणारे तथाकथित विद्वान बरेच आहेत. वेंडीबाई डॉनीगर बद्दल तर बोलायलाच नको! या भाऊगर्दीपेक्षा शेल्डन पोलॉक यांची विद्वत्ता वरची आहे. त्यामुळेच त्यांची स्वत:ची मते व त्यांच्याच संपादनाखाली चालणाऱ्या भाषांतर प्रकल्पातील उणीवा, दोष दाखवून देण्यासाठी तितक्याच वैचारिक प्रगल्भतेची आणि अभ्यासाची गरज आहे. केवळ तोंडाला शाई फासणे, उथळ चर्चा करणे किंवा याकडे संपूर्ण दुर्लक्ष करण्याएवढे हे सोपे नक्कीच नाही.

सध्या change.org या संकेतस्थळाच्या माध्यमातून पोलॉक यांना या संपादकपदावरून हटवावे अशी मागणी करणारी एक मोहीम चालवली जात आहे. लोकसत्ता या अग्रगण्य दैनिकाने एका जळजळीत अग्रलेखाद्वारे (हटाववादी हुच्च्पणा) या मोहिमेचे वाभाडे काढले परंतु पोलॉक यांना विरोध का केल्या जात आहे ते मुळातून समजून घेण्याची आवश्यकता दाखवली नाही. ‘पद्मश्री’ पोलॉक यांची मुख्य संपादकपदावरून गच्छंती करणे तत्सम एका इंटरनेट अर्जाद्वारे शक्य नाही हे न कळण्याइतपत ‘१३२ विद्वान’ ज्यांनी ही मोहीम सुरु केली आणि त्यांचे ‘१७४५० नाव गाव नसणारे पाठीराखे’ दुधखुळे नक्कीच नाहीत. या अर्जाचा मुख्य उद्देश डॉ. पोलॉक यांचे संस्कृत व संस्कृतीबद्दलचे निष्कर्ष समाजासमोर आणून त्यावर चर्चा घडवणे हा आहे, जो बऱ्याच अंशी यशस्वी झाला आहे. याविषयीचे अनेक लेख विविध इंग्रजी दैनिकांतून प्रकाशित होत आहेत परंतु प्रादेशिक भाषांमधील लेखांची नेहमीप्रमाणे वानवा आहे. मुळात मूर्ती क्लासिकल लायब्ररी किंवा त्याद्वारे केल्या जाणाऱ्या भाषांतराला विरोध नसून या उपक्रमाचे मुख्य संपादकपद भूषवणाऱ्या डॉ. शेल्डन पोलॉक यांच्या वैचारिक भूमिकेला आहे. तसेच हा उपक्रम बंद करण्याचा हेतू नसून लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याचा आहे. स्वदेशी की विदेशी असेही या वादाचे स्वरूप नाही.

शेवटी मूर्ती क्लासिकल लायब्ररीला हार्दिक शुभेच्छा देऊन एकच अपेक्षा आपण व्यक्त करू शकतो की या उपक्रमाद्वारे भाषांतरित होणारे ग्रंथ शेल्डन पोलॉक यांना अभिप्रेत असणाऱ्या अर्थाऐवजी मूळ ग्रंथांशी इमान राखणारे असावेत ज्यायोगे रोहन मूर्तींचे दान कुपात्री ठरणार नाही.

टीप: डॉ. पोलॉक यांनी लिहिलेल्या अभ्यासलेख व पुस्तकांची यादी मोठी आहे. तरी इच्छुकांनी खालील काही संदर्भ नक्कीच बघावेत.
  1. Pollock, Sheldon. 1985. ‘The Theory of Practice and The Practice of Theory in Indian Intellectual History’. Journal of the American Oriental Society, 105 (3): 499.
  2. Pollock, Sheldon. 1993b. ‘Ramayana and Political Imagination in India’. The Journal of Asian Studies, 52 (2) 261.
  3. Pollock, Sheldon. 2001b. ‘The Death of Sanskrit’. Comparative Studies in Society and History, 43 (2): 392.
  4. Pollock, Sheldon. 2006. The Language of The Gods in The World of Men. Berkeley: University of California Press.
  5. Pollock, Sheldon. 2006. ‘Crisis in The Classics’. Journal of Social Research, 78 (1): 21.

Thursday, February 3, 2011

"तुम्ही का लिहिता?"

'Other Colours' या
पुस्तकाचे मुखपृष्ठ
तुर्की लेखक ओरहान पामुकने साहित्याचे नोबेल पारितोषिक स्वीकारताना दिलेल्या My Father’s Suitcase या दीर्घ भाषणातील एका भागाचा हा स्वैर अनुवाद. (हे संपूर्ण भाषण Other Colours या पुस्तकात दिलेले आहे)

तुम्हा सर्वांना माहितीच असेल की लेखकांना जास्तीत जास्त वेळा विचारण्यात येणारा, आवडता प्रश्न असतो तो - "तुम्ही का लिहिता?"

मी लिहितो कारण लिहिणे ही माझी आंतरिक गरज आहे. मी लिहितो कारण मला अन्य लोकांसारखी नेहमीची कामे करता येत नाहीत. मी लिहितो कारण मी लिहिलेल्या पुस्तकांसारखी इतर पुस्तके मला वाचायची असतात. मी लिहितो कारण मी तुमच्यावर रागावलोय, मी सर्वांवरच रागावलोय. मी लिहितो कारण मला एका खोलीत दिवसभर बसून लिहायला आवडतं. मी लिहितो कारण वास्तविक आयुष्यात बदल करूनच मला त्यात सहभागी होता येतं. मी लिहितो कारण इस्तंबूल, तुर्कस्तानात आम्ही कशा प्रकारचे जीवन जगलो आणि आजही जगतो आहोत हे इतरांना, आपणा सर्वांना, संपूर्ण जगाला कळावं अशी माझी इच्छा आहे. मी लिहितो कारण इतर कशावरही नाही इतका विश्वास मला साहित्यावर आणि कादंबरी लिहिण्याच्या कलेवर आहे. मी लिहितो कारण पेपर, पेन आणि शाईचा वास मला आवडतो. मी लिहितो कारण ती एक सवय आहे, एक आत्यंतिक उर्मी. मी लिहितो कारण मी विस्मरणात गेल्याची भीती मला सतत वाटत असते. मी लिहितो कारण त्यातून मिळणारा सन्मान आणि उत्साह मला आवडतो.

स्वतःला एकांतात ठेवण्यासाठी मी लिहितो. फक्त तुमच्यावरच नाही तर इतर सर्वांवरच मी इतका जास्त का रागावलोय हे मला लिहिण्यातून उमजेल असं वाटतं, कदाचित त्यामुळेच मी लिहितो. मी लिहितो कारण इतरांनी ते वाचलेलं मला आवडतं. मी लिहितो कारण एकदा लिहायला घेतलेलं पान, निबंध, कादंबरी मला पूर्ण करायची असते. मी लिहितो कारण सर्वजण मी काहीतरी लिहावं अशी अपेक्षा करत असतात. मी लिहितो कारण ग्रंथालयांच्या चिरतरुणतेवर आणि कप्प्यांवर विराजमान झालेल्या माझ्या पुस्तकांवर माझा भाबडा विश्वास आहे. गोष्ट सांगण्यासाठी नव्हे तर ती तयार करण्यासाठी मी लिहितो. मी लिहितो कारण आयुष्यातल्या सुंदर, भव्य आणि उत्तम गोष्टींना शब्दरूप देणं मला खूपच उत्साही करतं. स्वप्नात एखाद्या ठिकाणी जसं जाता येतं अगदी तसंच खरंखुरं जाता येत नाही आणि या दु:खद, दुर्दैवी शक्यतेपासून लांब राहण्यासाठीच मी लिहितो.

मी लिहितो कारण मला कधीच आनंदी होणं जमलं नाही. मी लिहितो कारण मला आनंदी व्हायचंय.