Showing posts with label अनुभव. Show all posts
Showing posts with label अनुभव. Show all posts

Thursday, May 7, 2020

जाणे अज मी अजर

गानसरस्वती स्व. किशोरी आमोणकर यांनी भारतीय शास्त्रीय संगीत परंपरेला श्रीमंत केलेले आहेच परंतु त्याचबरोबर संत साहित्याची चैतन्यानुभूतीही त्यांनी श्रोत्यांपर्यंत आणून ठेवली आहे. पं. कुमार गंधर्वांप्रमाणे संतसाहित्याचा सर्वार्थाने अभ्यास करून त्यांनी संत ज्ञानेश्वर, संत जनाबाई, संत एकनाथ, संत तुकाराम, संत सोयराबाई, संत मीराबाई यांच्या रचना श्रोत्यांपर्यंत पोहचवल्या. या रचना ऐकणाऱ्या प्रत्येकाला रचनाकाराची परमेश्वराशी एकरूप होण्याची धडपड समजून घेता येते. संत ज्ञानेश्वरांची अशीच एक रचना “जाणे अज मी अजर” किशोरी आमोणकरांनी गायलेली आहे. यात कुठलेही वाद्यसंयोजन नाही. आहे तो केवळ किशोरीताईंचा धीरगंभीर आवाज आणि त्यास तंबोऱ्याची साथ. या द्वयीतून साकारले गेलेले नादविश्व इतके अलौकिक आणि दैवी आहे की ऐकणाऱ्यांना ‘ब्रह्मानंदी टाळी’ लागण्याचा दुर्लभ अनुभव क्षणभर का होईना नक्कीच मिळतो.

वयाच्या एकविसाव्या वर्षी संजीवन समाधी घेतलेल्या महायोगी संत ज्ञानेश्वरांनी भगवद्गीता प्राकृत मराठीत शब्दश: न आणता त्यातील भावासहित आणली. म्हणूनच ती ‘भावार्थदीपिका’ - ज्ञानेश्वरी.  “जाणे अज मी अजर” या ओवींचे आणखी एक वैशिट्य म्हणजे त्या ज्ञानेश्वरीच्या शेवटच्या, अठराव्या अध्यायात आलेल्या आहेत. ज्ञानेश्वरांनी या अखेरच्या अध्यायास ‘कळसाध्याय’ म्हटले आहे. तो शेवटचा अध्याय आहे म्हणून कळसाध्याय नव्हे तर मंदिराचा कळस जसा दुरून पथदर्शक ठरतो तसा हा गीताप्रासादाचा कळसाध्याय संपूर्ण गीतादर्शनासाठी मार्गदर्शक ठरला आहे.

जी गीतारत्नप्रासादाचा | कळसु अर्थचिंतामणीचा |

सर्व गीतादर्शनाचा | पाढाऊ जो || (ज्ञा. १८-३०)

स्वत:चे शरीर आणि आत्मा यांना पृथक जाणून आत्मा परमात्म्यात विलीन करणे,  परब्रह्माशी एकरूप होणे हे भारतीय तत्त्वज्ञानाचे, एकूणच धर्मशास्त्राचे अंतिम ध्येय आहे. हाच ‘मोक्ष’! कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तीयोग या मार्गांवरून चालल्यास मोक्षप्राप्ती होते असे भगवद्गीता सांगते. गीतेच्या अठराव्या अध्यायात (मोक्षसंन्यासयोग) श्रीकृष्ण सांगतात,

 भक्त्या मामभिजानाति यावान्यश्चास्मि तत्त्वतः ।

ततो मां तत्त्वतो ज्ञात्वा विशते तदनन्तरम्‌ || (गीता १८-५५)

याचे सर्वसाधारण भाषांतर असे करता येते की,  आपल्या भक्तीने परमात्म्याला तो जसा आहे तसाच तत्त्वत: जाणणारा त्यात लगेचच प्रविष्ट होतो.

आता परमात्म्याला तत्वत: जाणणे म्हणजे नक्की काय? परमात्म्याला तत्वत: कसे जाणावे? परमात्मा-परब्रह्म दिसतो कसा? त्याचे स्वरूप काय? तो स्त्री अथवा पुरुष आहे काय? तो किती जुना आहे? तो निर्माण कधी आणि कसा झाला? त्याचा स्वभाव काय? तो नक्की करतो काय? अशा अनेकविध क्लिष्ट प्रश्नांच्या उत्तरासाठी परत ज्ञानेश्वरीच मार्गदर्शक ठरते. ज्ञानेश्वरीतल्या अठराव्या अध्यायातील ११९३ ते १२०० या ओवींमध्ये मुख्यत: ‘मी’ या प्रथमपुरुषी सर्वनामाची विशेषणे आली आहेत. ‘मी’ कोण? तर परमात्मा-परब्रह्म. परंतु परमात्म्याला जाणणारा ‘तो’ (साधक) आणि ‘मी’ (परमात्मा) असा भेद न राहता सरतेशेवटी केवळ ‘मी’च राहतो. येथे शेवटची ओवी संपते.

परमात्मा कसा आहे? त्याला जन्मही नाही आणि जरामरणही नाही. त्याला अंत नाही अन आरंभही नाही. तो अपार आहे, अथांग आहे. तो अरूप-निर्गुण-निराकार आहे. तो अनादी-अनंत-चिरंतन आहे. तो अविनाशी आहे. तो अभय-आधार-आश्रय प्रदान करतो. तो सर्वव्यापक आहे. सहज-सर्वत्र भरून राहिलेला आहे तरीही तो असंग आहे . तो कर्मबंधनातून मुक्त आहे, स्वतंत्र आहे. त्यात भर घालता येत नाही आणि त्यात घटही होत नाही. तो नवीनही आहे आणि जुनाही. तो आद्य आहे आणि अर्वाचीनही. तो शून्य आहे तसेच संपूर्णही. तो सूक्ष्म आहे आणि जडही. व्यक्त आहे आणि अव्यक्तही. परमात्मा अशा टोकाच्या विरोधाभासांनी युक्त आहे कारण त्याच्याकडे भेदाभेद नाही. तो ‘अद्वैत’ आहे. अशा परमात्म्याला जाणणे सोपे नक्कीच नाही. त्यास शब्दश: जाणले. परंतु त्यासाठी कुठला मार्ग अनुसरावा? अनन्यभक्ती! अद्वैतास जाणणारी ‘अद्वयभक्ती’. या अद्वयभक्तीने जो परमात्म्यास जाणू पाहतो तो स्वतच: परब्रह्म-परमात्मा होतो – हाच मोक्ष!

किशोरीताईंनी रागरससिद्धांतावर आधारित ‘स्वरार्थरमणी’ हा ग्रंथ सिद्ध केला आहे. मी ‘ग्रंथ सिद्ध केला आहे’ असे का म्हणत आहे ते ‘स्वरार्थरमणीच्या’ वाचकांना नक्कीच समजले असेल. त्या लिहतात की, “शरीराचे अस्तित्व हे अल्पकाळ टिकणारे, मर्यादित स्वरुपाचे असते. परंतु आत्म्याचे अस्तित्व हे अपरिमित, अमर्याद, निराकार, निरंजन, चिरंतन, स्थिर स्वरुपाचे असते. त्याची फक्त जाणीव वा अनुभूती येऊ शकते. त्याचे आपल्याला ज्ञान होत असते, प्रचिती येत असते. अशा तर्‍हेची प्रचिती माध्यमातून येणे हे माध्यमाचे पूर्णस्वरूप, अंतिमस्वरूप असते...माध्यमातून आत्मप्रचिती किंवा आत्मसौंदर्याची प्रचिती येणे हे पर्यायाने स्वतःच्या आत्म्याचेच दर्शन वा बोध असतो”. अद्वयभक्ती करण्यासाठी लागणारे माध्यम व्यक्तीपरत्वे भिन्न असू शकते. किशोरी आमोणकरांसाठी हे स्वरमाध्यम आहे. एकदा आत्म्याचा बोध झाला की परमात्म्यात विलीन होण्याची प्रक्रिया सुकर होते. या गानसरस्वतीला हे साध्य झाले यात नवल ते कसले?

 

जाणे अजु मी अजरु । अक्षयो मी अक्षरु ।

अपूर्वु मी अपारु । आनंदु मी ॥ ११९३ ॥

 अचळु मी अच्युतु । अनंतु मी अद्वैतु ।

आद्यु मी अव्यक्तु । व्यक्तुही मी ॥ ११९४ ॥

 ईश्य मी ईश्वरु । अनादि मी अमरु ।

अभय मी आधारु । आधेय मी ॥ ११९५ ॥

 स्वामी मी सदोदितु । सहजु मी सततु ।

सर्व मी सर्वगतु । सर्वातीतु मी ॥ ११९६ ॥

 नवा मी पुराणु । शून्यु मी संपूर्णु ।

स्थूलु मी अणु । जें कांहीं तें मी ॥ ११९७ ॥

 अक्रियु मी येकु । असंगु मी अशोकु ।

व्यापु मी व्यापकु । पुरुषोत्तमु मी ॥ ११९८ ॥

 अशब्दु मी अश्रोत्रु । अरूपु मी अगोत्रु ।

समु मी स्वतंत्रु । ब्रह्म मी परु ॥ ११९९ ॥

 ऐसें आत्मत्वें मज एकातें । इया अद्वयभक्ती जाणोनि निरुतें ।

आणि याही बोधा जाणतें । तेंही मीचि जाणें ॥ १२००॥

                                                                                            - संत ज्ञानेश्वर

Saturday, April 9, 2011

हे जीवन सुंदर आहे?

निराशा तिची व्याप्ती सतत वाढवत चालली आहे. दु:ख आणि दैन्य यांनी चराचर व्यापल्याची जाणीव गडद होते आहे. आपल्याच सीमित परिघात रत झालेल्या बहुतेकांना व्यर्थ सुरक्षिततेची भावना सुखी करत आहे परंतु या येणाऱ्या काळोखाची व्याप्ती आणि तिचं गांभीर्य, संपूर्ण विश्व व्यापून टाकण्याच तिचं सामर्थ्य त्यांच्या लक्षात आलेलं नाही. हे जेव्हा त्यांच्या लक्षात येईल तोपर्यंत बहुतेक उशीर झालेला असेल. ज्या थोड्या लोकांना हे समजले आहे त्यांच्याकडे केवळ दोन पर्याय उरलेत. पहिला म्हणजे या निराशेच्या अधीन होणे आणि दुसरा म्हणजे शक्य होईल तिथवर तिच्या विरोधात उभे ठाकणे. यांपैकी पहिल्या पर्यायात कुठल्याही उपपर्यायाची शक्यता नाही कारण तिथे विरोध करण्याची प्रक्रियाच नाही, आहे ते परिस्थितीला शरण जाणे. दुसऱ्या पर्यायात मात्र एक छुपी वाट आहे - पळवाट. स्वतःला सिद्ध करण्याच्या प्रयत्नांत, निराशेविरोधात लढण्यावेळी स्वतःच्या सीमित क्षमतेची जाणीव होताच अचानक दृगोच्चर होणारी पळवाट. ही वाट निवडताच निराशेविरोधात लढण्याची गरज आणि कारण दोन्ही संपून जातात. संपूर्ण सृष्टीला आपल्या काळकवेत घेणाऱ्या निराशेला आपण शोधलेली पळवाट सापडली नाही म्हणून आनंदी होणारे लोक. त्यांना हे समजत नाही की त्यांच्या जगण्याचं कारणच संपलं आहे, लढाई करता करता त्यांनी आपसूकच शस्त्रे ठेवून दिली आणि ते निराशेला शरण गेले. शरण आलेल्यांवर वार केल्या जात नसतो.

सभ्यतेचे बुरखे टराटरा फाटत आहेत. आदर्शांची राखरांगोळी होते आहे, ज्यांवर विश्वास ठेवला तेच सर्वांत मोठे घातकी निघत आहेत. जवळचे दूर गेलेत आणि कशाचाच कशाशी संबंध नसणारे, लटांबर घेऊन आसपास गर्दी करत आहेत. गुरु म्हणून कुणाला बघावं तर तो गुरुघंटाल निघतोय.

मातृभूमी, देशभक्ती, मातृभाषा या शोकेस मध्ये शोभणाऱ्या काचेच्या ठिसूळ वस्तू बनून राहिल्या आहेत. जरा कुठे धूळ बसलीये म्हणून पुसण्याचा प्रयत्न करावा तर खळ्ळकन तुकडेच हातात येत आहेत. नव्याने आलेल्यांना त्यामुळेच शोकेस उघडण्याचीही परवानगी नाही आणि काहीवेळेस बघण्याचीही. केवळ काही ठराविक दिवशी त्या नाजूक वस्तू बाहेर काढून ठेवल्या जातात, त्यांवरची धूळ काळजीपूर्वक पुसल्या जाते, अभावाने डागडूजी केली जाते आणि त्या वस्तू परत शोकेस मध्ये ठेवून दिल्या जातात. हे सारं कुणी करावं त्याचेही निकष ठरलेले आहेत. या निकषांमध्ये न बसताही या कामांत ढवळाढवळ करणाऱ्यांना चाबकाने फोडून काढले जात आहे. ज्या लोकांची पायदळी तुडवण्याची लायकी नाही ते डोक्यावर येऊन बसले आहेत. इतर काहींचा नंगानाच सुरू आहे आणि त्याखाली भरपूर लोक दाबून मरत आहेत. त्यातून वाचलेले त्याच बीभत्स आणि रक्तपिपासू लोकांच्या नाचात सामील होण्यासाठी धडपड करत आहेत आणि यातही कित्येकांना मरण येत आहे.

हे विश्व कधीही शांत नव्हतं. ज्याची उत्पत्तीच स्फोटातून झाली आहे ते शांत कसे असेल? सदैव अशांत, अतृप्त आणि त्यामुळेच दु:खी. सत्ता भोगण्याची लालसा आणि त्यापायी आलेली उन्मादकता हे एकच सत्य ठळकपणे कालातीत भासत आहे आणि तसे प्रयत्न केले जात आहेत. लढायांना, यु्ध्दांना नैतिकतेच्या, सत्याच्या, देशप्रेमाच्या, कधी अन्यायाच्या खोट्या आणि बनावट कोंदणात बसवून त्यांना प्रकाशमान करण्याचा प्रयत्न होतोय. इतिहासात डोकावून कुठल्याही लढाईचे संदर्भ दोन्ही बाजूंनी तपासा. आपला योद्धा तो त्यांचा कैदी, आपला आदर्श तो त्यांचा गद्दार, आपल्यासाठी परमपूज्य तो त्यांच्यासाठी फितूर, आमचा तारणहार तो त्यांच्यासाठी फरारी, आमचा धर्मप्रचारक तो त्यांच्यासाठी इतर धर्माचा अपमान करणारा. अवघे विश्व अनादी कालापासून अशा विरोधाभासांनी भरलेले आहे. यात सारेच ओढले गेलेत. जे काही अपवादाने बाजूला राहू शकले त्यांनी नवनिर्मिती केली, नवीन कल्पना मांडल्या, त्यांना मूर्त स्वरूप दिले. सुंदर वाटावे अशा प्रतीविश्वाची निर्मिती केली परंतु हे सुंदर प्रतीविश्व सुद्धा याच उपभोगी विश्वात त्यांना उभं करावं लागलं. बऱ्याच काळापर्यंत ते टिकून होतं, कालपरत्वे संकुचित होत गेलं पण टिकून होत. आता मात्र त्याच्या अस्तित्वाबाबत आता शंका येऊ लागली आहे. 

मुर्ख लोकांनी तयार केलेली बाग आणि त्याहून मुर्ख असणाऱ्यांचे त्यात मनसोक्त फिरणे एवढेच आता शिल्लक आहे. काही मूठभर लोकांच्या अनुभूतीला खरे मानून आपले विलासी, अतृप्त जीवन सुंदर करायला निघालेल्या माणसांचा त्या अनुभूतीला स्पर्शही होत नाही कारण ती त्यांच्यासाठी निर्माण झालेली नसते आणि या अथक आणि तरीही व्यर्थ प्रयत्नांचे फळ म्हणून मिळते ते आणखी विलासी आणि अतृप्त जीवन. दिसत आहेत ते अवशेष, मस्तकाविना धडाचे, तेही असंख्य. भूतकाळात धर्मप्रसाराच्या ‘नैतिक’ अधिष्ठानाच्या पोकळ सोंगापायी भव्य, सुंदर मुर्त्यांचा बळी गेला आणि आता आपली पाळी आली आहे.


Wednesday, January 19, 2011

आईसगोला…

गडद हिरवा रंग फासलेला लाकडी गाडा, त्यावर तेवढ्याच गडद रंगातलं छोटेखानी यंत्र लावण्यात आलंय, त्या यंत्रात बर्फाचा चौकोनी तुकडा दाबून बसवण्यात आलाय, गाड्यावर मुद्दाम तयार करवून घेतलेल्या खाचांमध्ये/स्टॅंडमध्ये ठेवलेल्या काचेच्या बाटल्यांतलं रंगीत पाणी उठून दिसतंय, या बाटल्यांना पिचकारीच्या तोंडासारखं निमुळतं होत गेलेलं झाकण लावलंय. वेगळ्या ठेवण्यात आलेल्या काही बाटल्यांमध्ये जेलीपेक्षा जरासा पातळ असा रंगीत पदार्थ भरून ठेवलाय,या बाटल्यांना मात्र नेहमीचंच साधं झाकण बसवण्यात आलंय. एका बाजूला लाकडी काड्या रबरबॅंडच्या सहाय्याने एकत्र बांधून ठेवल्यात. खाली कितीतरी ठिकाणी फाटलेलं लालभडक रंगाचं प्लॅस्टिक अंथरलंय. काही ठिकाणी ते इतकं फाटलंय की त्यातून खालचं झिजलेलं लाकूड स्पष्ट दिसतंय. उग्र पण सुवासिक उदबत्तीचा गंध गाडीच्या आसपास दरवळतोय, आत दोन-तीन देवांच्या तसबिरी टांगल्यात, बाहेरून ठोकण्यात आलेल्या खिळ्यांवर मळकी फडके लटकताहेत. गाडीच्या दर्शनी भागावर त्याच्यावरच ठेवलेल्या बाटल्यांमधील पाण्यालाही लाजवील इतकं सुरेख आणि भरपूर रंगकाम केलंय, त्यावर मोठ्या अक्षरांत लिहिलंय –“आईसगोला” आणि खाली कोपऱ्यात किंमती लिहिल्यात- “1रु. 2रु. 5रु, 10रु.(जंबो)”.

आमच्या शाळेसमोर अशी एक आईसगोल्याची गाडी नेहमी उभी असायची. “आईसगोला चांगला नसतो”, “तिथे वापरतात तो बर्फ खराब झालेला असतो”, “रंगीत पाणी घाण, शिळं असतं”, “आईसगोला खाल्ल्यामुळे गालफुगी होते” इतकी भीती कमी म्हणून की काय पण विचित्र आजारांची नावं सांगून आम्हांला घाबरवलं जाई. हे झालं घरात परंतु शाळेत बाईंना गोळ्याविषयी कळालं की मार तर ठरलेलाच असे. मधल्या सुट्टीत पोरं शाळेच्या गेटबाहेर पडत. गोळ्या, बिस्किट्स, अप्पू, गोड सोप, स्टीकर्स, मुरकुल(बॉबी), तिखट-मीठ लावलेली बोरं, भेळ, कोल्ड्रिंक्सच्या रिकाम्या बाटल्यांतून मिळणारी केशरी, पोपटी रंगाची सरबतं अशा कित्येक खाण्या-पिणाच्या वस्तू सोडून आमची नजर जाई ते आईसगोल्याच्या गाड्याकडे. त्या बाटल्यांतून दिसायचं गडद चॉकलेटी रंगाचं कालाखट्टा, केशरी रंगाचं ऑरेन्ज, हिरव्या रंगाचं खट्टा आम, पिवळ्या रंगाचं पाइनॅपल, लाल रंगाचं रोज... जितके वेगळे रंग तितकीच वेगळी त्यांची चव! “एवढे सुंदर रंग वाईट कसे असू शकतील?”, “एक रुपयाच्या गोळ्याने आपण असे किती आजारी पडणार आहोत?”, “शाळेत गोळा खाल्लाय हे घरी थोडंच कळणार आहे” या प्रश्नांना मनातून सकारात्मक उत्तरे मिळताच (आणि ती मिळतंच!) आपोआपच त्या आईसगोला बनवणाऱ्या मामांच्या हातात एक रुपया टेकवला जाई.

गाड्यावरच्या लोखंडी यंत्राचं हॅंडल फिरवताच पांढराशुभ्र भुसभुशीत बर्फ खाली पडे. बाजुला ठेवलेल्या काड्यांपैकी एका काडीचं वाकवलेलं एक टोक त्या ‘ताज्या’ बर्फात घुसवलं जायचं. मग त्यावर कापडाने दाब देऊन अंडाकृती आकार बनवल्या जायचा. दोन्ही तळहातांमध्ये ठेवलेली ती काडी फिरविताच त्याच्या खाली लावलेल्या गोळ्याचे शिंतोडे चेहऱ्यावर उडत. यानंतर खरी गंमत सुरु होई. आपल्या आवडीच्या रंगांची फर्माईश केली जाई. हिरव्या-लाल रंगाचा जेलीसारखा रस बाटलीच्या बाहेर येत असतानाच गोळा फिरवल्यामुळे त्याची सुंदर नक्षी तयार होत असे. “थोडा लाल टाका, थोडा ऑरेंज डालो, कालाखट्टा” या आमच्या मागण्या गोळा बनवणाऱ्या मामांच्या मूडनुसार किंवा आमच्या नशीबानुसार पूर्ण होत! अखेर अनंतकाळाच्या प्रतीक्षेनंतर रंगांची आणि चवींची सरमिसळ झालेला तो आईसगोला आमच्या हातात येई. गोळा हातात येताच मित्राला मिळालेल्या गोळ्याचा रंगांशी तुलना केली जायची, एखादे सर किंवा बाई बघत नाहीयेत याची खात्री केली जायची आणि त्यानंतरच बाजूला उभ्या असणाऱ्या मोठ्या मुलांच्या हातातील पाच रुपयांच्या आईसगोल्याकडे हेव्याने पाहत आपला आईसगोला तोंडाला लावण्यात जी मजा येई ती अमृतप्राशन करताना देवांनाही आली नसेल बहुदा! गोळा संपत येताच मामाला त्यावर थोडासा रंग टाकून देण्याची विनंती केली जायची. अर्थात त्यालाही मूडनुसारच प्रतिसाद मिळे. “एका रुपयात किती रंग खातो बे” अशी बोलणीही कधीकधी खावी लागत पण त्यानंतर पडणारा रंग जास्त महत्वाचा असे.

एकदाचा गोळा खाऊन संपला की आठवण येई येणाऱ्या तासाच्या बाईंची! एव्हाना आईसगोल्याने त्याचे काम चोख बजावलेलं असे. त्यावर प्रेमाने पसरलेला रंग आमच्या ओठांवर आणि जिभेवरही तितक्याच प्रेमाने पसरत असे. मघाशी बाटल्यांत पाहिलेले रंग आता आमच्या ओठांवर बघून मजा येई. पूर्ण लाल रंगाचा गोळा खाणारा मित्र जास्त टेन्शनमध्ये असायचा कारण केशरी, काळा, पिवळा रंग पाण्याचे दोन-तीन गुळणे करताच निघून जायचे परंतु लाल रंग सहजासहजी निघत नसे. मग लालभडक ओठ हातांनी झाकत येणारा तास ढकलला जाई त्यातही त्याला बाईंनी एखादा प्रश्न विचारला की झालं कल्याण! रंग काढण्यासाठी रुमालाचा वापर निषिद्ध मानला जायचा (कारण घरी कळण्याची भीती!). हे सगळं झालं ते बाईंचा मार चुकवण्यासाठी परंतु गोळा खाताना खूप प्रयत्न करून, झाडामागे लपून,पाठमोरा होऊनही सरांनी किंवा बाईंनी बघितलं असेल तर त्यांचा तास उलटून जाईपर्यंत त्या गोळ्याची चव जिभेवर रेंगाळत राहण्याची आणि हातावरचे छडीचे वळ घरी जाईपर्यंत न मिटण्याची खात्री देता येत असे.

कधीकधी आपल्या शर्टालाही आईसगोला खाण्याची इच्छा होती हे बदामी रंगाच्या शर्टावर छान रंगीत डाग दिसल्यावर कळे. काहीवेळेला तो दाग इतका मोठा असायचा की त्याला खालून रेष ओढली तर तो हुबेहूब आईसगोलाच दिसला असता. ‘दाग अच्छे है’ म्हणण्याची तेव्हा हिम्मत नव्हती(आत्ताही नाही!). अशावेळी मात्र बाई आणि आई दोघींनाही कळण्याच्या भीतीने डबल टेन्शन येत असे पण आमच्यातल्या काही ‘अनुभवी’ पोरांनी त्यावरही उपाय शोधून काढला होता, डाग पडलेल्या ठिकाणी खडू घासायचा! तेही अपूरं पडत असेल तर त्यावर निळ्या शाईचे दोन थेंब टाकून त्यावरून खडू घासला जायचा. “शाई उडाली” हे उत्तर दिल्यावर खावी लागणारी बोलणी, मारापेक्षा नक्कीच परवडणारी असायची. सुदैवाने अशी वेळ फार क्वचित यायची, पहिलाच उपाय बहुतेकवेळा पुरेसा ठरत असे. परीक्षेच्या शेवटच्या दिवशी धमाल असायची. घरी आईसगोला खाण्याविषयी जाहीररीत्या सांगितलं जायचं पण पाच रुपयाचा गोळा हवे तितके रंग टाकूनही गोड लागायचा नाही कारण त्यादिवशी सारेच मित्र पाच रुपयाचा गोळा खायचे आणि मोठी मुले दहा रुपयांचा! उन्हाळ्याच्या सुट्यांत फ्रीजरमध्ये जमा झालेला बर्फ चमच्याने खरवडून त्यात रसना टाकून ऑरेंज फ्लेवरचा आईसगोला तयार करण्याचा प्रयत्न करण्यात यायचा परंतु मामांसारखा जमायचा नाही.

यथावकाश आम्ही मोठे झालो, आवडीनिवडी बदलल्या पण गाड्यावरचे रंग आणि गोळा बनवणारे मामा मात्र तेच राहिले. नंतर शाळेतच कॅन्टीन निघाली आणि गेटबाहेर जाण्यावर बंधनं आली तेव्हाही मामा पोरांची वाट बघत गेटबाहेर उभे राहिल्याचे दिसायचे. परीक्षेच्या शेवटच्या दिवशी मात्र सर्वजण आईसगोला खायचेच. शाळा संपली तशी गोळ्याची उरलीसुरली सवयही सुटली, नंतर कधी गोळा फारसा खाण्यात आलाच नाही. आंम्ही मोठे झाल्यामुळे असेल कदाचित पण आईसगोला दिसल्यानंतर आम्हालाही त्या बर्फाबद्दल आणि तिथे वापरण्यात येणाऱ्या रंगांबद्दल शंका यायला लागली...

इथे कंपनीत नुकताच आईसगोल्याचा एक स्टॉल लागला आहे पण इथे बर्फाचा भुगा करणारी हॅंडलवाली मशीन नाही इथे बारीक केलेला बर्फ तयारच आहे. गोळा तयार करणाऱ्या मामांच्या डोक्यावर टोपी आहे, हातात प्लॅस्टिकचे ग्लोव्हज आहेत (Hygenic Food Norms!). बर्फाचा भुगा स्टीलच्या ग्लासात भरून त्यात काडी खोचली जाते, रंग शर्टावर सांडू नये म्हणून प्लॅस्टिकचा ग्लास दिल्या जातो, रंग टाकून घेण्यासाठी मरमर करावी लागत नाही. या सर्व सोयींसाठी २०रु.ही मोजावे लागतात! पण या आईसगोल्यावरचा रंग जिभेवर उतरत असतानाच अचानक शाळेसमोरचे मामा आठवतात, डागावर लावलेला खडू आठवतो, आईची बोलणी आठवतात आणि या सर्वांत वेगळा दिसू लागतो तो रंगांनी आणि आठवणींनी अधिकच गडद झालेला 1रु.चा आईसगोला!!!









Tuesday, January 11, 2011

बंडू आणि अंकल

       बंडूला ऑफिसला निघण्यासाठी आज जरा उशीरच झाला होता. दाराला कुलूप लावून पायऱ्या उतरत असताना त्याच्या लक्षात आलं की आयकार्ड आणि रुमाल घरातच राहिलाय. हे बंडूला नवीन नव्हतं. 'पेरूचा पापा'(पेन-रुमाल-चावी-पाकीट-पास) हे सूत्र लक्षात ठेवून सुद्धा बऱ्याच वेळेस स्वतःच्या विचारांच्या तंद्रीत असल्यामुळे तो पाकीट घेई पण त्याच्या बाजूलाच असलेलं आयकार्ड विसरून जाई. आजसुद्धा बहुदा तसंच झालं असावं. विसरलेल्या वस्तू घेऊन पुन्हा कुलूप लावत असतानाच त्याला समोरच्या दारातून बाहेर पडणारे गृहस्थ दिसले. "आंटीचा नवरा दिसतोय" तो मनातल्या मनात बोलला. परराज्यात असल्यामुळे जुजबी ओळख असलेल्यांना काका-काकू ऐवजी अंकल-आंटी म्हणण्याची त्याला सवय झाली होती. बंडू आणि त्याच्या रूममेट्सचं आंटीशी सोसायटीचं मेन्टेनन्स, लाईट बिल वरून बऱ्याचदा बोलणं होई. खरं म्हणजे बोलणं कमी आणि वाद जास्त असे. पण तरीही त्यांच्याशी कधीतरी अशाच गप्पाही होत आणि पुजेचा प्रसादही मिळे. पण बंडूची अंकलशी कधी भेट झाली नव्हती ना बोलणं. त्यांना 'good morning' म्हणावं असं त्याला वाटलं परंतु पुढच्याच क्षणी त्याच्या मनानं अडवलं- "काय करायचंय 'good morning' म्हणून?" आता 'good morning' म्हणून कुणाला काय करायचं असतं? आपल्या घरासमोर राहतात म्हणून औपचारिक अभिवादनाची पद्धत, पण या प्रश्नामागे पार्श्वभूमी होती. मागच्याच महिन्यात मेन्टेनन्सचे पैसे जास्त मागत असल्याच्या कारणावरून बंडू आणि त्याच्या रूममेट्सचं आंटीशी वाजलं होतं. गंभीर भांडणं नव्हती, आपल्याकडच्या सोसायट्यांत होतो तसा वाद झाला होता. तेव्हा 'ही समोरची पोरं फार बदमाश आहेत. मेन्टेनन्सचे पैसे बुडवतात' असं काहीसं आंटींनी त्यांच्या नवऱ्याला सांगितलं असावं असं बंडूला वाटलं. आधीच खराब असलेलं impression अजून खराब करून घेण्यात काही अर्थ नव्हता.
       एव्हाना बंडूच्या विचारांच्या एक्स्प्रेसने वेग घेतला होता. आज पहिल्यांदाच तो अंकलला इतक्या जवळून पाहत होता. पन्नाशीच्या आसपासचं वय, इन न केलेला पंधरा शर्ट, काळी पॅन्ट, पायात अंगठ्याच्या चपला, कामावर जाताना कुठल्याही मध्यमवर्गीयांच्या चेहऱ्यावर उमटतात तसे निर्विकार, काहीसे त्रासलेले भाव... "यांची बायको किती चलाख आणि हे किती साधे" तो विचार करत होता. फारशी ओळख नसलेल्यांना स्वतःच्या विचारांमध्ये चलाख, साधा, सज्जन, भांडकुदळ अशी विशेषणे लावायला काही हरकत नसते :-) "खरंच काय करायचंय अंकलला 'good morning' म्हणून?" त्याने प्रश्न निकालात काढला. प्रश्नाला प्रश्नानेच उत्तर देण्याची त्याची जुनी सवय होती!
       पायऱ्या उतरून तो खाली आला आणि गेटमधून बाहेर पडला. आज उशीर झाल्यामुळे नेहमीच्या स्टॅंडवर रिक्षा मिळणार नाही तर मेनरोडपर्यंत चालत जावं लागेल हे लक्षात येताच त्याने चालण्याचा वेग वाढवला. १५-२० पावले चालतो ना चालतो तोच अचानक मोटारसायकलवर बसलेले अंकल त्याच्या बाजूला येऊन थांबले. "I am going till main road, I will drop you" अंकलच्या या बोलण्याने बंडू उडालाच! ज्या माणसाबद्दल आपण इतका वेळ विचार करत होतो तो आपल्याला लिफ्ट देईल याचा त्याने विचारही केला नव्हता. "Thanks Uncle but I will get an auto". ऑटो लवकर मिळणार नाही हे माहित असूनसुध्दा केवळ औपचारिकता म्हणून त्याने उत्तर दिलं. "Come Come" अंकलनी पाठीमागच्या रिकाम्या सीटवर हात मारत त्याला बसण्याचा आग्रह केला.
"आपल्याला ओळखतही नसलेल्या अंकलने लिफ्ट का दिली असावी?, कदाचित आपला फॉर्मल ड्रेस, शूज, टाय पाहून अंकलवर impression पडलं असावं, बहुदा आंटींनी आपल्याबद्दल त्यांना काहीही वाईट सांगितलं नसावं, आपण किती वेडे आहोत, कुठल्याही गोष्टीचा किती विचार करत बसतो, सकाळी त्यांना 'good morning' म्हणालो असतो तर काय बिघडलं असतं?" (इथेही प्रश्नच!). त्याचे विचार सुसाट गतीने धावत असतानाच त्यांना अचानक ब्रेक लागला. अंकलनी मेनरोडवरच्या रिक्षा स्टॅंडवर गाडी थांबवली होती.
       "Thanks Uncle" हे दोनच शब्द बंडूच्या तोंडून बाहेर पडले. मनात मात्र विचारांनी गर्दी केली होती...!

ता. क. : यातला बंडू म्हणजे मी स्वतः आहे! आपल्या स्वतःशी घडलेल्या घटना तृतीयपुरुषी एकवचनात लिहिल्या तर त्यात जास्त तटस्थता येते असं मला वाटतं. हे योग्य नसेल कदाचित पण स्वतःबद्दल फार तटस्थतेने लिहिणं मला अजून चांगलं जमत नाही त्यात कुठेतरी 'soft corner' यायला लागतो म्हणूनच ही तृतीयपुरुष एकवचनाची सोय!