Showing posts with label पुस्तकं. Show all posts
Showing posts with label पुस्तकं. Show all posts

Friday, April 29, 2016

परंपरांचे पाईक


 सदरील लेख साप्ताहिक विवेकच्या (२४ एप्रिल) अंकात छापून आला आहे. 

द बॅटल फॉर संस्कृत या पुस्तकाचे मुखपृष्ठ
प्रत्येक संस्कृतीत काही पारंपरिक विचारमूल्ये व त्यांना प्रमाण मानणारा एक मोठा वर्ग आढळून येतो. या विचारमूल्यांवर आक्षेप घेणाऱ्यांना तीव्र सामाजिक विरोधास सामोरे जावे लागते आणि बहुधा अशा आक्षेपांची शहानिशा न करताच ते रद्दबातल ठरवले जातात. भारतीय संस्कृती प्राचीन काळापासून आजतागायत टिकून असल्याने असे आक्षेप आपणांस नवीन नाहीत. परंतु आपल्या संस्कृतीचे वैशिष्टय असे की पारंपरिक मतांच्या संपूर्ण विरोधात जाणाऱ्या विचारसरणींनाही इथे चर्चा, वाद-विवादाद्वारे आपले मत मांडण्याची संधी देण्यात आली आणि या विचारसरणी अंगीकारणाऱ्यांनादेखील 'संस्कृतीबाह्य' ठरवले गेले नाही. कुठलाही नवीन सांस्कृतिक व वैचारिक प्रवाह त्यातील वैशिष्टयांसहित, मूळ प्रवाहात सम्मीलित करून घेण्याचे कसब आपल्या संस्कृतीने वेळोवेळी आजमावले. परकीय सैन्यामार्फत केल्या गेलेल्या पध्दतशीर आक्रमणांद्वारे 'लादण्यात' आलेल्या संस्कृती व विचारांवरही हा सर्वसमावेशकतेचा प्रयोग करून पाहण्यात आला. परंतु एकेकाळी अफगाणिस्तानापासून इंडोनेशियापर्यंत पसरलेली सांस्कृतिक मुळे आज केवळ भारतापुरतीच मर्यादित असण्याच्या वस्तुस्थितीवरून या प्रयोगाचे यशापयश पडताळून पाहता येते. हा सांस्कृतिक ऱ्हास नेमका कसा व कधी सुरू झाला, हा गहन चिंतनाचा विषय असून हा ऱ्हास आजही सुरूच आहे ही चिंतेची बाब आहे. यामुळेच भारतीय संस्कृतीतील 'पूर्वपक्ष-उत्तरपक्ष' परंपरेचे कालसुसंगत पुनरुज्जीवन करणे क्रमप्राप्त ठरले आहे. संस्कृतीविषयी आस्था व पारंपरिक मूल्यांवर श्रध्दा असणाऱ्या प्रत्येकाने विरुध्दावलोकन करून सांस्कृतिक, वैचारिक अथवा राजकीय हेतूने प्रेरित विरोधी भूमिका समजून घेऊन (पूर्वपक्ष) त्यास प्रतिवाद करणे (उत्तरपक्ष) आवश्यक आहे.

याच पूर्वपक्ष-उत्तरपक्ष परंपरेला अर्पण केलेले, 'The Battle for Sanskrit' हे राजीव मल्होत्रा यांचे पुस्तक हार्पर कॉलिन्स या विख्यात संस्थेने जानेवारी महिन्यात प्रकाशित केले. काही पाश्चात्त्य विद्यापीठांतून शिकवल्या जाणाऱ्या 'भारतविद्या' (Indology) या विषयांतर्गत संस्कृत भाषेचा व भारतीय संस्कृतीचा अभ्यास करताना पारंपरिक विचारमूल्यांना जाणीवपूर्वक वगळून मांडण्यात येणाऱ्या, पारंपरिक मतांना छेद देणाऱ्या नवविचारांची, संस्कृतवर व संस्कृतीवर घेण्यात येणाऱ्या आक्षेपांची माहिती येथील संस्कृतीला व परंपरांना प्रमाण मानणाऱ्या सश्रध्द संस्कृत विद्वानांना व अभ्यासकांना करून देणे हा या पुस्तकाचा मुख्य उद्देश आहे. थोडक्यात, संस्कृत भाषेचा अपारंपरिक दृष्टीकोनातून अभ्यास करणाऱ्या विद्वानमतांचा पूर्वपक्ष करून पारंपरिक विद्वानांना उत्तरपक्ष देण्याचे व त्यायोगे निष्कर्षणात्मक चर्चा घडवून आणण्याचे आवाहन यातून करण्यात आले आहे. संस्कृत आणि संस्कृती एकमेकांपासून विलग करणे अशक्य असल्याचा पुनरुच्चार मल्होत्रांनी वेळोवेळी केला आहे आणि त्यामुळे हे पुस्तक संस्कृतबरोबरच संस्कृतीचीही चर्चा करणारे ठरले आहे.

राजीव मल्होत्रा
आदिशंकराचार्यांनी स्वत: स्थापन केलेल्या शृंगेरी पीठाच्या धर्तीवर अमेरिकेतील कोलंबिया व इतर विद्यापीठांत सुरू करण्यात येणाऱ्या हिंदू धर्म व तत्त्वज्ञानावर आधारित अध्यासनांवर भारतीय संस्कृतीविषयी प्रतिकूल मते मांडणाऱ्या विद्वानांना बसवण्यात येण्याची दाट शक्यता लक्षात घेऊन मल्होत्रांनी महत्प्रयासाने शृंगेरी पीठाच्या शंकराचार्यांची भेट घेतली. धर्मपीठांच्या कडक शिस्तीत व परंपरांत न बसणाऱ्या व्यक्तींकडून अशी अध्यासने चालवली जाण्यातला विरोधाभास व त्यातून होऊ शकणारे दूरगामी परिणाम शंकराचार्यांना समजावून सांगतानाच याविषयीचा विस्तृत अहवाल वाचूनच परदेशी विद्यापीठांमधील अशा अध्यासनांस परवानगी देण्याची विनंती शंकराचार्यांना करण्यात आली. आदिशंकराचार्यांपासून सुरू झालेली परंपरा अयोग्य व्यक्तींकडे हस्तांतरित होऊ नये, यासाठी राजीवजींनी केलेले प्रयत्न मुळातून समजून घेणे आवश्यक आहे. हे पुस्तक म्हणजे या प्रयत्नांचीच फलश्रुती होय.

ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या प्रशासकीय सुलभतेसाठी सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात सर विल्यम जोन्सच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आलेल्या युरोपप्रणीत पौर्वात्य संस्कृतीच्या अभ्यासाची सूत्रे आता अमेरिकेतून कशी नियंत्रित केली जातात (European Orientalism to American Orientalism) याचे सविस्तर विवेचन या पुस्तकात आले आहे. या दोन्ही विचारधारांतील साम्य व फरक दाखवतानाच अमेरिकन पौर्वात्यवाद संस्कृतमधील पारंपरिक मूल्ये वगळण्याच्या दृष्टीने अधिक धोकादायक असल्याचे मल्होत्रांनी स्पष्ट केले आहे. अमेरिकन पौर्वात्यवादाचा आजचा चेहरा असलेले, जगप्रसिध्द संस्कृत विद्वान डॉ. शेल्डन पोलॉक यांच्या पुस्तकांचा व शोधनिबंधांचा गंभीरपणे अभ्यास करून भारतीय पारंपरिक विचारधारेत न बसणारी संस्कृतविषयक त्यांची मते आणि त्यानुसार काढले गेलेले निष्कर्ष वाचकांसमोर ठेवण्यात आले आहेत आणि हाच या पुस्तकाचा गाभा आहे. पोलॉक यांच्या विचारमतांची चिकित्सा करण्यामागे त्यांची विद्वता, जागतिक स्तरावर संस्कृत व भारतीय संस्कृतीसंबंधी त्यांच्या मतांना असणारे वजन, भारतातील डाव्या विचारसरणीच्या अभ्यासकांमध्ये त्यांच्याप्रती असणारा 'अति'आदरभाव अशी काही कारणे आहेत. वर उल्लेख केलेल्या अध्यासनासंबंधित अभ्यास समितीचे अध्यक्षपदही पोलॉक यांच्याकडेच आहे! संस्कृतमधील शास्त्रांचे वर्णन भारतीय संस्कृतीतील 'समस्या' असे करणारा, तसेच सर्व शास्त्रे वेदांवर आधारलेली असल्याने त्यांतून नवीन शिकण्यासारखे काही नाही असे मत मांडणारा पोलॉक यांचा शोधनिबंध १९८५ साली प्रकाशित झाला. तेव्हापासून आजतागायत सुमारे तीस वर्षांत एकाही भारतीय पारंपरिक संस्कृत पंडिताने अथवा अभ्यासकाने पोलॉक यांच्या कार्याचा संपूर्ण आढावा घेऊन त्यांचा प्रतिवाद न केल्याची खंत मल्होत्रा व्यक्त करतात. यामागची कारणमीमांसा करतानाच यापुढे मात्र अशा मतांचे सुसंघटितपणे वैचारिक खंडन करण्याचे आवाहनही ते करतात.

आपल्या विचारांवर युरोपीय किंवा अमेरिकन पौर्वात्यवादाचा शिक्का बसू नये याबद्दल सजग असणारे पोलॉक मुळात सतराव्या शतकातील इटालियन पौर्वात्यवादी विको यांचेच विचार पुढे नेत संस्कृतचा अभ्यास करताना आधिदैविकता व आध्यात्मिकता बाजूला सारून भौतिक बाजूचाच प्रामुख्याने विचार करतात. अशा प्रकारे पारमार्थिकतेला बगल देऊन केवळ व्यावहारिक तत्त्वांचा आधार घेतल्याने पोलॉक आणि भारतीय पारंपरिक विचारमते यांच्यामध्ये मोठी तफावत निर्माण झाल्याचे मल्होत्रा सुचवतात.

भारतीय संस्कृतीचा अविभाज्य घटक असणाऱ्या मौखिक परंपरेतून वेदांतील ज्ञान पिढयानपिढया संक्रमित करण्यात आले, अशी आपली सर्वसाधारण धारणा आहे. परंतु या मौखिक परंपरेला पारमार्थिक ठरवून त्याचेही महत्त्व पोलॉक नाकारतात. केवळ ब्राह्मणांचीच मक्तेदारी असणाऱ्या वेदाध्ययनाव्यतिरिक्त संस्कृतचा इतर कुठलाही उपयोग नव्हता आणि वेदाधारित ज्ञान नवनिर्मिती करण्यास उपयुक्त नसल्याने त्यात सांगितली गेलेली यज्ञादि कर्मकांडे, मंत्रघोष इत्यादींचा वापर ब्राह्मणवर्गाने स्वार्थ साधण्यासाठी केला. यातून संस्कृत ब्राह्मण्यवादाचे महत्त्व पध्दतशीररित्या वाढवण्यात आले आणि इतर वर्गांचे शोषण करणारी सामाजिक उतरंड अस्तित्वात आली, अशा पोलॉकप्रणीत विचारांचा विशेष ऊहापोह या पुस्तकात करण्यात आला आहे.

वेदांना प्रमाण न मानणाऱ्या बौध्दमताच्या प्रभावामुळेच पूर्वी मौखिक स्वरूपात  बंदिस्त असलेल्या संस्कृत भाषेचा वापर लिखाणासाठी सर्वप्रथम करण्यात आला आणि इथूनच संस्कृतचा खरा इतिहास सुरू होतो, असा पोलॉक यांचा आणखी एक निष्कर्ष आहे. संस्कृतात काव्य (कविता, नाटय, इतर साहित्य) रचण्यास सुरुवात झाल्याने ती केवळ वेदांतील देवस्तुती करणारी भाषा न राहता जनसामान्यांची भाषा बनली आणि त्यामुळेच काव्ये (न ठरता व्यावहारिक ठरत असल्याने) वेदांपेक्षा भिन्न मानावीत, तसेच काव्यांमध्ये आलेली कालानुरूप शोषणमूल्ये काढून टाकावीत असा त्यांचा आग्रह आहे. ही सर्व 'पोलॉकमते' राजीव मल्होत्रांनी संयतरित्या खोडून काढली आहेत.

शेल्डन पोलॉक
या पुस्तकात एक संपूर्ण प्रकरणच पोलॉक यांचा रामायणासंबंधी दृष्टीकोन स्पष्ट करण्यासाठी लिहिले गेले आहे. रामायणाची ऐतिहासिकता नाकारतानाच ते जातक कथांवर आधारित, बुध्दोत्तरकालीन वैदिक ब्राह्मणांनी रचलेले प्रथम संस्कृत काव्य असल्याचे मत पोलॉक यांनी रामायणावरच्या शोधनिबंधात मांडले आहे. ब्राह्मण-राजसत्तेच्या संगनमताने, राम-रावणातील युध्दाचा आधार घेत अकराव्या शतकापासूनच परकीय मुस्लीम आक्रमकांना राक्षसांच्या स्वरूपात दाखवले गेले आणि स्थानिक राजांना देवत्व प्राप्त करवून दिले गेले, असे पोलॉक मानतात. एवढेच नव्हे, तर हिंदू-मुस्लिमांमधील वादाचे मूळ रामायणात शोधण्याचा प्रयत्न करत बाबरी प्रकरणासाठीही ते रामायणासच जबाबदार मानतात. महाभारताचे वर्णनही त्यांनी भाऊबंदकीस उत्तेजन देणारी, यादवी युध्दास कारणीभूत ठरणारी 'जगातील सर्वांत धोकादायक राजकीय गोष्ट' असे केले आहे. हे विचार भारतीय पारंपरिक मतांच्या पूर्णत: विरोधी असल्याने त्यांना वैचारिक प्रत्युत्तर देणे आवश्यक आहे.

पोलॉक यांच्या 'The Death of Sanskrit' या प्रसिध्द शोधनिबंधाची मल्होत्रांनी अभ्यासपूर्ण चिकित्सा केली आहे. हिंदू राजांच्या दुर्लक्षामुळे संस्कृत भाषा बाराव्या शतकाच्या आसपासच मृत (नवनिर्मिती करण्यास अक्षम) झाली असून मुस्लीम राज्यकर्त्यांनी आपापल्या परीने तिच्या पुनरुज्जीवनाचे प्रयत्न केले, संस्कृतच्या प्रभावाखाली राहावे लागत असल्याने तिच्यात आणि इतर भारतीय भाषांमध्ये तेढ निर्माण झाली, प्रादेशिक भाषांना मिळणाऱ्या उत्तेजनामुळे संस्कृतचा प्रभाव ओसरण्यास मदतच झाली, इत्यादी अनेक मुद्दे त्यातून समोर येतात. या निबंधाच्या सुरुवातीलाच भारतीय जनता पार्टी आणि विश्व हिंदू परिषद यांच्यावर हिंदुत्ववादी राजकारण करून भारताच्या इतिहासाचा विपर्यास केल्याचा आक्षेप पोलॉक घेतात, तसेच स्वातंत्र्यानंतरच्या संस्कृत प्रसारप्रयत्नांची 'राजकीय' अशी संभावना करतात.

अभ्यासकाने राजकीय मते व्यक्त करण्यात काही गैर नाही. नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांच्याविरुध्द किमान चार, तसेच आता भारत सरकारच्या कार्यपध्दतीविरुध्द (वेंडीबाई डॉनिगरच्या पुस्तकासंबंधी, जेएनयू वादासहित) वेळोवेळी इंटरनेट अर्जांवर स्वाक्षरी करत आपली भूमिका मांडणाऱ्या पोलॉक यांची राजकीय मते पुरेशी स्पष्ट आहेत. संस्कृत भाषेला आर्यभाषा ठरवतानाच वंशवाद, वर्चस्ववाद व शोषणमूल्यांचे उगमस्थान मानणाऱ्या, जर्मनीतील नाझीवादासाठी संस्कृतला कारणीभूत ठरवणाऱ्या, मौखिक परंपरा व संस्कृत शास्त्रे, मंत्र यांना नाकारणाऱ्या, रामायणास बुध्दोत्तरकालीन वैदिक ब्राह्मणांचे प्रथम काव्य मानणाऱ्या शेल्डन पोलॉक यांना काँग्रेसप्रणीत यू.पी.ए. सरकारने संस्कृत भाषेतील योगदानासाठी २००९ साली राष्ट्रपती सन्मानपत्र व २०१० साली पद्मश्री देऊन त्यांचा 'यथोचित' सन्मान केलेला आहेच.

मूर्ती क्लासिकल लायब्ररीच्या मुख्य संपादकपदी करण्यात आलेली पोलॉक यांची निवडही चर्चेचा विषय बनली आहे. हा विषयही सर्वप्रथम राजीव मल्होत्रांनीच आपल्या व्याख्यानांतून तसेच या पुस्तकातून लोकांसमोर आणला. नारायण मूर्तींचे चिरंजीव रोहन मूर्ती यांच्या संकल्पनेतून व आर्थिक पाठबळातून साकार होणाऱ्या या उपक्रमांतर्गत संस्कृतसहित इतर भारतीय भाषांमधील सुमारे पाचशे प्राचीन ग्रंथांचे इंग्लिशमध्ये भाषांतर केले जाणार आहे. या उपक्रमाला विरोध नसला, तरीही भारतीय पारंपरिक मूल्यांवर अविश्वास दाखवून ती नाकारणाऱ्या पोलॉक यांच्या देखरेखीखाली होणारे भाषांतर मूळ ग्रंथांशी सुसंगत असेल की नाही, अशी शंका उपस्थित करण्यात येत आहे. या उपक्रमान्वये भाषांतरित झालेल्या पुस्तकांमधील ठळक दोष दाखवून देण्याचे कार्यही संबंधित भाषांमधील काही विद्वान करत आहेत.

या पुस्तकाचा समारोप करताना पोलॉकमतांचे सविस्तर खंडन करण्यासाठी उपयोगी पडू शकणाऱ्या मार्गदर्शक तत्त्वांचा विचार केला गेला आहे. पुस्तकाच्या शेवटी दिलेली परिशिष्टे व संदर्भ यादी पाहून मल्होत्रा यांच्या चौफेर अभ्यासाची, तसेच या पुस्तकासाठी त्यांनी घेतलेल्या परिश्रमांची कल्पना येते. संस्कृतसाठीच्या या लढयाचे स्वरूप 'विदेशी विरुध्द स्वदेशी' किंवा 'पोलॉक विरुध्द मल्होत्रा' अशा वैयक्तिक स्वरूपाचे नसून 'अपरंपरागत विद्वानमते विरुध्द परंपरागत विद्वानमते' असा आहे. सध्या सर्वत्र व विशेषत: महाराष्ट्रात 'प्रथा' आणि 'परंपरा' यांतील मूलभूत फरक लक्षात न घेता दोहोंनाही समानार्थी शब्दांनुसार सररास वापरले जात आहे. परंपरांचा अभिमान बाळगण्यास सांगणारी 'प्रतिज्ञा'ही आता पाठयपुस्तकांतून हद्दपार करण्यात आली आहे. असे असतानादेखील आपल्या समृध्द आणि वैविध्यपूर्ण परंपरांचे पाईक होण्यासाठी, संस्कृत(ती)साठी चाललेल्या या लढयात कुठल्या बाजूने उतरावे, याची निश्चित दृष्टी हे पुस्तक देते.

Saturday, January 8, 2011

रादुगा प्रकाशन, मॉस्को


पुस्तकं म्हटल्याबरोबर सर्वांत आधी माझ्या डोळ्यासमोर येतात ती बाबांनी आणलेली रादुगा प्रकाशनाची पुस्तकं! मुंबईहून परत येताना बाबा भरपूर पुस्तकं घेऊन यायचे. रादुगा प्रकाशन, मॉस्कोची रशियन भाषेतली परंतु मराठी आणि हिंदीमध्ये अनुवादित केलेली पुस्तके लक्षात राहिली ती त्यांच्यातील सुंदर चित्रांमुळे, सोप्या भाषेमुळे आणि त्यावेळी अत्यंत विचित्र वाटणाऱ्या रशियन नावांमुळे. या पुस्तकांचं मराठीत भाषांतर अनिल हवालदार करायचे. अनुवादित असल्याने पुस्तकांचं नाव सरळ सोप्या मराठी किंवा हिंदी भाषेत असायचं पण आतील पात्रांची नावे मात्र रशियनच असायची. 'मासा आज्ञा देतो', 'मुंगी आणि कबुतर', 'जंगलची घरे', 'सारिका आणि कोल्ही', 'तीन अस्वले', 'गुलगुला', 'खगोलशास्त्र', 'माझे पहिले प्राणीशास्त्र', 'गाणारे पीस' अशी पुस्तकांची मराठी/हिंदीतली छोटी, सुटसुटीत नावं आणि येमेल्या,मिशुत्का,मिखाईल ईवानीच, नास्त्यासा पेत्रोवाना, निलोव्हना, पेत्रिक अशी माणसांची आणि प्राण्यांची नावं... ही पुस्तकं माझ्या मनाच्या इतक्या जवळ आहेत की त्यांचा विषय निघताच ती मला १७-१८ वर्षे मागे घेऊन जातात...

नवीन पुस्तक दिसताच सर्वांत आधी मी पानांचा वास घ्यायचो. डोळे बंद करून पुस्तक नाकाजवळ नेताना मला पुस्तकातलं एकही चित्र पाहायची किंवा एकही पान वाचायची इच्छा नसायची. नंतरचा बराच वेळ पुस्तकातली चित्रे बघण्यात निघून जाई. गडद रंगातली ती चित्रं, प्राण्यांचे-विशेषतः छोट्या अस्वलांचे गोंडस चेहरे, मोठ्या माणसांच्या मिशा, म्हाताऱ्या आजोबांची दाढी, टेकडीवर जाऊन ढगांचे आकार बघत बसणारी मुलं, लहान मुलांचे रंगबिरंगी कपडे, बूट, सुटाबूटातला कोंबडा. याचबरोबर घरातल्या झाडूपासून ते राजवाडातल्या उंची मद्याच्या पेल्यापर्यंत सार्‍या वस्तुंची चित्रेही अगदी सहज डोळ्यासमोरुन तरळून जाताहेत...  छोटी, उबदार घरं, धुराड्यातून निघणारा धूर, हिरवीगार कुंपणं, डोंगर, दर्‍या, नद्या... बाहेर बर्फ भुरभुरत असल्याने घरात रजई घेउन गाढ झोपलेला छोटा मुलगा, घरात रात्री लावलेल्या दिव्याचा मंद प्रकाश पसरलाय, खिडकीतून बाहेर उभा असलेला कुत्रा दिसतोय. अशी चित्रे पाहिल्यावर मलाही तिथे जावंसं वाटे. चित्रे पाहून झाल्यानंतर वेळ येई पुस्तक वाचण्याची. पांढ‍र्‍याशुभ्र कॅनवाससारख्या पेपरवरची गडद रंगांतील चित्रे आणि त्याखाली काळ्या शाईतल्या काही ओळी... पुस्तक हिंदीत असेल तर बाबांकडून नाहीतर मावशीकडून त्याचं मराठीत भाषांतर करवून घ्यायचं. खूप मजा यायची वाचताना. बहुतेकवेळा बाबाच त्यातल्या गोष्टी वाचून दाखवत, तेही एका विशिष्ट तर्‍हेने. नाटकातली माणसं जशी बोलतात तसं. बाबांच्या तशा वाचण्यामुळेच काही वाक्यं अजूनही आठवतात... "मासा आज्ञा देतो, माझी इच्छा आहे. चुलाण्या तू घरातून निघ आणि थेट झारच्या दरबारात मला घेउन जा", "खांद्यावर तलवार टाकून डौलत कोंबडा येतो, टोपी शिवायला कोल्हीची खांडोळी करायला येतो. कोल्हीताई सांभाळ बाहेर ये"(कोल्हीला मारायला निघालेला कोंबडा तिला ’ताई’ म्हणत बाहेर यायचं आव्हान देतो आहे!!), "मी सुध्दा तिथे होतो. मध,बीयर प्यालो. मिशांतून थेंब गळाले पण तोंडात एकही थेंब पडला नाही", "ढगांच्या गडगडाटाला आणि विजांच्या चमचमाटाला मी भीत नाही", "मैं दादासे बच निकला।मैं दादीसे बच निकला।खरहे को भी नही मिला।नही भेडिये मैं भालू को भी नही मिला।तुझसे सुन ओ लोमडी, बचना मुश्किल क्या भला?"(हे शेवटचं गाणं तर घरातून पळून गेलेली एक ’पुरी’ गात असते!!), "म्याऊ म्याऊ।ठीक है ठीक।"... बापरे! ही वाक्यं आठवून आता खूप हसू येतंय पण अशा वाक्यांनीच माझं बालपण किती श्रीमंत केलं होतं तेही आत्ताच समजतंय.

यातल्या येमेल्याची गोष्ट वाचून मी आळशी झालो नाही. बीयर पिणार्‍या आजोबांचं चित्र पाहून मला कधी बीयर पिण्याची इच्छा झाली नाही. कोल्हीची खांडोळी करायला निघालेल्या कोंबड्याने मला हिंस्त्र बनवलं नाही. या पुस्तकांतून इसापनिती, पंचतंत्रासारखे उपदेश नसायचे. उलट पार्ट्यांमधून नाचणारी, मध,बीयर पिणारी पात्रे होती. माशाच्या सहाय्याने झारच्या मुलीला पटवणारा येमेल्या होता, मदतीच्या वेळी पळून जाणारी, उपकार विसरणारी कृतघ्न, कपटी माणसे होती, शाळा बुडवून टेकडीवर फिरायला जाणारे मित्र होते, आई-बाबांचं न ऐकता गावभर उनाडक्या करत फिरणारं अस्वलाचं पिल्लू होतं... एकाप्रकारे लहान वयात मुलांवर जे संस्कार करावे म्हणतात तसं या पुस्तकात फारसं काही नसायचं. या पुस्तकांची निर्मीतीच छोट्यांचं मनोरंजन करण्यासाठी, त्यांना आनंद देण्यासाठी आणि मुख्यत: त्यांना वाचनाची गोडी लावण्यासाठी करण्यात आली असावी. यासाठी त्यांना बोजड उपदेश कथांचा आधार घ्यावा लागला नाही. अर्थात सारीच पुस्तके अशी नव्ह्ती. खगोलशास्त्र, जहाजं, जंगलांची माहिती देणारी पुस्तकेही होती. नातवाला चिनार वृक्षाची गोष्ट सांगणारे आजोबा होते, फुलदाणी फुटल्याचं खरं कारण आईला सांगत असतानाच डोळ्यांत टचकन पाणी येणारा पेत्रिक होता, अंधार्‍या रात्री जंगलात वाट चुकलेल्या वर्गमैत्रिणीला धीर देणारा मित्र होता, धूर्त व्यापार्‍याला पकडून देणारा मुलगा होता. हे सारं असतानाही इसापनितीच्या ५०१ गोष्टींच्या पुस्तकाप्रमाणे, प्रत्येक गोष्ट संपल्यासंपल्या त्याखाली ’तात्पर्य:.............’ अशी ओळ मला या पुस्तकांमधून कधीही दिसली नाही.

आठ-दहा वर्षांपर्यंत म्हणजे माझ्या लहान भावाने काळ्या-निळ्या रंगांचे पेन घेऊन त्या मुंगीच्या पाठीवर तिच्यापेक्षा पाचपट मोठा लाडू किंवा डोंगर काढेपर्यंत तसेच गवतावर पहुडलेल्या शेतकर्‍याची पांढरी दाढी काळी करेपर्यंत आणि त्याच्यातल्या भावी चित्रकाराची जाणीव मला होईपर्यंत बर्‍याच पुस्तकांची पाने कॅनवास म्हणून कामी आली होती! एखादा संशोधक ज्या तळमळीने आणि मरमर करत जुन्या वस्तू जपण्याचा प्रयत्न करत असतो तशीच माझी अवस्था झाली होती. लहान भावाला ’हाताचा’ प्रसाद दिल्यानंतर त्याचा हात पोहोचणार नाही अशा उंच ठिकाणी मी उरलेली पुस्तके ठेवुन दिली आणि त्यांची तब्येत आजही छान आहे!

रादुगा’ या रशियन शब्दाचा अर्थ आहे ’इंद्रधनुष्य’. माझं बालपण या पुस्तकांनी खरोखरच इंद्रधनुष्यासारखं रंगबिरंगी आणि सुंदर बनवलं होतं. या पुस्तकांनी मला काय दिलंय हे मलाही पूर्ण कळालेलं नाही. लहानपणीच्या या खर्‍या मित्रांबद्दलची कृतज्ञता अशा काही ओळी लिहून व्यक्त करणे शक्य नाही...

आता ती पुस्तकं हातात घेऊन मी पुन्हा त्या पानांचा वास घेतोय. त्यांना आधीसारखा वास येत नाहीये तर जुनाट पानांना येतो तसा काहीसा कुबट वास येतोय. पण मला हा वासही तितकाच हवाहवासा वाटतोय. खूप दिवसांनी जुन्या मित्रांना भेटल्याचा आनंद होतोय. ही पुस्तके कदाचित आपल्याला विसरली असावीत असा विचार मनात येताच... एकेक पुस्तक अलगद उघडलं जातंय. येमेल्या पुन्हा माशाला आज्ञा करु लागलाय, पेत्रिक आईसमोर रडतोय, सहलीला आलेल्या मुलांना बाई गोष्ट सांगताहेत, म्हातारा त्याची हिरे देणारी बकरी शोधतोय, मुंगळा घाईघाईने घरी परतलाय, खांद्यावर तलवार टाकून डौलात येणार्‍या कोंबड्याला घाबरून कोल्ही जोरात पळतीये, टेकडीवरच्या त्या ढगात आला मलाही विचित्र आकार दिसताहेत, घरातून पळालेल्या पुरीच्या मुर्खपणामुळे एक लांडगिणीने तिला खाऊन टाकलंय, रात्रीच्या वेळी शांत झोपलेल्या घरांच्या खिडक्या, रस्ते पिवळट-सोनेरी रंगांनी न्हाऊन गेल्यात त्यामुळे रात्रीच्या अंधाराला सोनेरी साज चढलाय आणि अंगणातला चिनार, आजोबांची गोष्ट ऐकून पुन्हा एकदा तृप्त झालाय...