Showing posts with label ठिकाणं. Show all posts
Showing posts with label ठिकाणं. Show all posts

Friday, December 24, 2010

ऐहिक आणि ऐतिहासिक धनुषकोडी... भाग-२

       रामेश्वरम आणि धनुषकोडी ही दोन्ही अतिप्राचीन गावं अगदी नावासहित रामायणाशी जोडली गेली आहेत. तिथलं ज्योतिर्लिंग, राम, लक्ष्मण, सीता, हनुमान कुंड, रामसेतू, विभीषण मंदिर अशा स्थळांना भेट दिल्यावर रामायणाला केवळ कविकल्पना माणनारे लोकसुद्धा एकदा फेरविचार करायला उद्युक्त होतील. श्रद्धाळू लोकांचं तर विचारूच नका! काशीयात्रा रामेश्वरमच्या समुद्रात स्नान केल्यावरच पूर्ण होते असे आपल्याकडे मानले जाते. आता कुठे काशी आणि कुठे रामेश्वरम... तरीही लाखो भाविक श्रद्धेने रामेश्वरमची यात्रा करतात आणि जमल्यास धनुषकोडीही पाहून घेतात.

       'धनुषकोडी' या तमिळ शब्दाचा अर्थ आहे धनुष्याचं टोक! यामागची कथा अशी - रामाने धनुषकोडीहून लंकेकडे जाणारा सेतू बांधायला सुरुवात केली. (समुद्राच्या पाण्यावर तरंगणारे तसे सच्छिद्र खडक (corals) आजही या ठिकाणी पाहायला मिळतात. वास्तविक इथून तलाईमनारपर्यंत जाणारी अंदाजे ३१ किमी लांब प्रवाळ खडकांची रांग (coral reef) आहे. आता यालाच रामसेतू मानायचं की एक 'नैसर्गिक योगायोग' हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा भाग आहे). रावणवध केल्यानंतर राम, सीता आणि रामसेना विभीषणासहित इथे आली. तेव्हा विभीषणाने रामाला तो सेतू तोडून टाकण्याची विनंती केली आणि रामाने धनुष्याच्या टोकाने सेतू तोडून टाकला म्हणून हे 'धनुषकोडी'. इथे विभीषणाचं एक मंदिरसुद्धा आहे.

       धनुषकोडीचा आणखी एक उल्लेख येतो तो स्वामी विवेकानंदसंबंधी. हिंदू धर्माची मूलभूत तत्वे पाश्चिमात्यांना समजावून सांगितल्यानंतर स्वामीजींनी मातृभूमीत पाय ठेवला तो याच धनुषकोडीत! या जागेचं आणखी एक महत्व म्हणजे हे ए.पी.जे अब्दुल कलामांचं जन्मगाव. त्यांचे वडील रामेश्वरम ते धनुषकोडी भाविकांना बोटीतून ने-आण करायचे.

       असं हे धनुषकोडी भूतकाळात एक मोठं व्यापारी, पर्यटन केंद्र म्हणून प्रसिद्ध होतं. मग अचानक एकाएकी काय झालं की या गावाची सारी रया गेली, भूतकाळातील संपन्नतेच्या खुणा जाऊन त्याजागी विपन्नतेची लक्षणं कशी आली? भरभराटीला आलेलं धनुषकोडी 'Ghost Town' कसं बनलं?

बोट मेल (Boat Mail)

clip_image002

                                                          सौजन्य: http://indianrailways.informe.com/

       १८९८ पासून एगमोर-कोलंबो रेल्वे सुरू करण्यात आली होती. आधी ती तुतीकोरीन पर्यंत येई तिथून तलाईमनार पर्यंत बोटीचा प्रवास (ferry) आणि तलाईमनार ते कोलंबो पुन्हा रेल्वे असा तो प्रवास असे. नंतर पांबनचा पूल बांधण्यात आल्यावर (हा पूलच रामेश्वरमला उर्वरीत भारताशी जोडतो) एगमोर ते धनुषकोडी अशी रेल्वे सेवा सुरू करण्यात आली. धनुषकोडीपर्यंत रेल्वे, पुढे तलाईमनारपर्यंत बोटीचा प्रवास आणि परत कोलंबोपर्यंत रेल्वे या प्रवासास आधीपेक्षा खूपच कमी वेळ लागायचा. बोट मेल सारख्याच इतर काही रेल्वेही धनुषकोडीपर्यंत जायच्या त्यातच एक होती पांबन-धनुषकोडी पॅसेंजर…

       चक्रीवादळे या गावांना नवीन नव्हती. परंतू १९ डिसेंबर १९६४ रोजी हिंदी महासागरात दुर्मिळ वातावरणीय स्थितीत निर्माण होणारं आणि त्यामुळेच रौद्रभीषण ठरणारं एक चक्रीवादळ निर्माण झालं. २२ डिसेंबरच्या मध्यरात्री पांबन-धनुषकोडी पॅसेंजर धनुषकोडी स्टेशनात येत असतानाच अशा काही लाटा उसळल्या की त्यांनी ती ट्रेनच नव्हे तर संपूर्ण गावच गिळंकृत केला. ट्रेनमधले सर्व ११५ प्रवाशी मृत्यूमुखी पडले. असे सांगतात की मृतदेह सापडणे दूर, ट्रेनचे अवशेषही बऱ्याच दिवसांनंतर मिळाले. त्या वादळात धनुषकोडी पूर्ण उध्वस्त झालं. एकून १८०० लोक मृत्यूमुखी पडले. यानंतर सरकारने ते गाव परत वसवलं नाही किंबहुना लोकांनाच तिथे रहायची इच्छा उरली नसावी. कारण काहीही असो पण एका रात्रीत उध्वस्त झालेल्या त्या 'Ghost Town' पर्यंत आता एकही ट्रेन धावत नाही…

clip_image004

                                                          सौजन्य: http://www.google.co.in/images

काही लिंक्स:

या वादळाची इत्यंभूत वैज्ञानिक माहिती इथे वाचता येईल

http://journals.ametsoc.org/doi/abs/10.1175/1520-0450%281966%29005%3C0373%3ASSOTRC%3E2.0.CO%3B2

यातल्या लेखिकेचं कुटूंब त्या चक्रीवादळात दुमजली घरामुळे वाचलं होतं.

http://www.withinandwithout.com/2005/12/remembering-1964-dhanushkodi/

'The Hindu’ मधील लेख

http://www.hindu.com/mp/2004/03/06/stories/2004030600010100.htm

सोयीची वाहतूक साधने नसतानाही आता बरेच लोक धनुषकोडीला भेट देतात हे सांगणारा एक लेख

http://www.hindu.com/2010/06/28/stories/2010062858210300.htm

१९६४ च्या वादळात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली म्हणून एक दगडी स्मारक धनुषकोडी येथे बांधण्यात आलंय. त्यावरील ओळी:

"A cyclone storm with high velocity winds and high tidal waves hit Dhanushkodi town from 22 December 1964 midnight to 25 December 1964 evening causing heavy damages and destroying the entire town of Dhanushkodi"

या घटनेला आज ४६ वर्षे होऊन गेली... त्या चक्रीवादळात मृत्युमुखी पडलेल्यांना यानिमित्ताने श्रद्धांजली अर्पण करूयात...

ऐहिक आणि ऐतिहासिक ‘धनुषकोडी’… भाग-१

image

       जितकं गूढ तितकंच रम्य, जितकं भकास तितकंच सुंदर, जितकं उदास तितकंच उत्साही... वीज, रस्ते, टुमदार घरं असं ‘ऐश्वर्य’ काहीच नसल्यानं केवळ अशा विरोधाभासांनीच सजलेलं 'धनुषकोडी'. रामेश्वरमपासून धनुषकोडीकडे जाणाऱ्या अंदाजे २० किमी. डांबरी रस्त्याच्या दुतर्फा दिसतील ती फक्त बाभळीची काटेरी झुडूपं, पिवळट-पांढरी वाळू किंवा निळाशार समुद्र. रामेश्वरमहून वाट वाकडी करून इथे येणारे फार कमी लोक असतात कारण धनुषकोडीला काय आहे असं विचारताच, 'कूछ नही है, सब उजाड, बंजर, रेत है|' असं उत्तर मिळण्याची शक्यता जास्त असते.धनुषकोडीला सहसा 'Ghost Town' म्हणूनच ओळखल्या जातं! 

       धनुषकोडीला उतरताच समोर दिसते ती भारतीय नौदलाची चेकपोस्ट. तिथल्या एका खांबावर दिमाखात लावलेली ट्यूबलाईट नजरेस पडते. इथून पुढे धनुषकोडी गाव, कन्याकुमारी सारखंच भारताचं शेवटचं टोक आणि बंगालचा उपसागर-हिंदी महासागर यांचा संगम पाहण्यासाठी जवळच उभ्या असलेल्या मिनी ट्रक्स ची मदत घ्यावी लागते. माणशी ५०-१००रु. 'season' नुसार आकारले जातात, यात जाणं-येणं दोन्ही आलं. आम्ही धनुषकोडीला गेलो तेव्हा महाशिवरात्री नुकतीच होऊन गेल्यामुळे रामेश्वरमची बरीच गर्दी इथे आलेली होती त्यामुळे ट्रक मिळणं आणि तो प्रवाशांनी भरणं यात जास्त वेळ गेला नाही. 'भरणं' म्हणजे काय ते खालील फोटोवरून कळेल...

Picture 122 [1024x768]

       स्वतःची गाडी असली तरीही या ट्रक्स आणि त्यांच्या ड्रायव्हर्सवर विश्वास ठेवणे चांगले. पुढील प्रवासात याची कल्पना येतेच. २०-२५ मिनिटांचा हा प्रवास वाळू आणि समुद्राच्या पाण्यातून होतो! रस्ता, पायवाट या गोष्टी समुद्राने कधीच पुसून टाकल्यात. समुद्राच्या भरती, आहोटीच्या वेळापत्रकानुसार हा 'तथाकथित' रस्ताही बदलतो! या प्रवासासंबंधी तीन बाबींची मी खात्री देतो-
१. पाणी पिण्यासाठी बाटली उघडलीत तर पाणी तोंडात पडण्याऐवजी बाजूला खेटून बसलेल्या प्रवाशाच्या अंगावर   पडणार!
२. पाठ अखडली असेल तर मोकळी होणार!
३. हा प्रवास एक अविस्मरणीय अनुभव असणार!
 
    

       खारट पाण्याचे शिंतोडे अंगावर घेत, दोन्ही बाजूला अथांग समुद्र मधून चिंचोळा वाळूचा भूभाग, तोही बर्‍याचदा पाण्याखाली असा आमचा प्रवास एकदाचा संपला. ट्रक थांबला. खाली उतरून पाहतो तर तिन्ही बाजूंनी निळाशार समुद्र! डावीकडे बंगालचा उपसागर आणि उजवीकडे हिंदी महासागर. संगमाची नेमकी जागा, पाण्याचा बदललेला रंग दिसतोय का ते शोधक नजरेने पाहायचा व्यर्थ प्रयत्न करून पाहिला परंतू ते अगदी बेमालूमपणे एकमेकांत मिसळून गेले होते, त्यांचं स्वतंत्र अस्तित्व त्यांच्या एकत्र येण्यात अडसर ठरलं नाही. समुद्र अगदी शांत आणि स्वच्छ होता. गर्दी फारशी नसल्यामुळे किना‌र्‍यावर कागदी कपटे, प्लॅस्टिकच्या बाटल्या असा कुठलाही कचरा आढळला नाही. सूर्य मावळतीकडे कलला होता, आम्ही भारताच्या शेवटच्या टोकावर उभे होतो, इथेच कधीतरी राम, लक्ष्मण, हनुमान, इतर वानरसेना जमली असेल, त्यांनी लंकेला जाण्याबद्दल चर्चा केली असेल, सेतू बांधायला सुरूवात केली असेल... आपणही आज त्याठिकाणी उभे आहोत हे पाहून मन शहारुन आलं. इथून श्रीलंका फक्त ३१ किमी अंतरावर आहे, भौगोलिक द्द्ष्ट्या हे भारत आणि लंकेमधलं सर्वांत कमी अंतर आहे. रात्री तिथले लाईट्स दिसतात अशीही माहिती कोणीतरी पुरवली. तमिळ भाषेबाबत आनंदच असल्याने परत जायची वेळ झालीये हे ड्रायव्हरच्या सांगण्यापेक्षा त्याच्या ट्रककडे जाण्याने कळाले…  आता ट्रकने वेग घेतला होता. मावळतीचं आकाश तांबड्या-केशरी रंगांनी भरून गेलं होतं. वारा भन्नाट सुटला होता. हा ’रस्ता’ वेगळा भासत होता कारण आता सगळीकडे वाळूच दिसत होती. समुद्रापासून आम्ही लांब आलो होतो. ट्रक परत थांबला. वाळूची छोटीशी चढण उतरताच एक पडकं चर्च दिसलं, त्याच्याबाजूलाच जुनाट उध्वस्त झालेली इमारत उभी होती.

 
"भिंत खचली, कलथून खांब गेला, 
जुनी पडकी उध्वस्त धर्मशाळा"


       बालकवींच्या ओळी त्या जागेला तंतोतंत लागू पडत होत्या. आजूबाजूला बाभळीची झुडूपे उगवलेली होती. त्यांचा एकूण विस्तार पाहता गेल्या कित्येक वर्षांत त्यांच्या वाटेला कुणी गेलेलं नाही हे स्पष्ट जाणवत होतं. काही घरांचे अवशेष शिल्लक होते. सार्‍या वातावरणात एक प्रकारची हुरहुर जाणवत होती. मावळतीचे रंग आता अधिकच गडद झाले होते. त्या संध्याकाळी पहिल्यांदाच ’कातरवेळ’ अनुभवत होतो. अस्वस्थ पण हवीहवीशी वाटणारी. आम्ही वीसेक माणसं होतो तिथे पण कुणी कुणाशी बोलत नव्ह्तं. ते वातावरणच भारलेलं होत. तिथली भयाण शांतता वार्‍याच्या आवाजाने आणखीनच गंभीर होत चालली होती. तिथून थोड्या अंतरावर काही बायका शंख, शिंपल्यांनी बनवलेल्या वस्तू विकत होत्या. काही माणसं मासेमारीसाठी जाळं विणत बसली होती. झावळ्या आणि तराट्यांनी बांधलेली काही साधी झोपडीवजा घरं द्दृष्टीस पडली. तिथे लहान पोरं खेळत होती. अशा ठिकाणी राहणार्‍या लोकांचं कौतुकमिश्रीत आश्चर्य वाटत होतं. ते ठिकाण एक दु:खद भूतकाळ वागवत असल्यासारखं दिसत होतं. 'Ghost Town' हे नाव अगदी सार्थ ठरवणारं...

     अंधार पसरत चालला होता. मला परत मागे फिरून श्रीलंकेचे दिवे पाहायची इच्छा झाली पण ते शक्य नव्हतं. ट्रक पुन्हा सुरु झाला. या गावाची ही अवस्था त्सुनामीमुळेच झाली असणार या आमच्या गैरसमजाला एका काकांनी दूर केलं. त्यांनी सांगितलं की धनुषकोडी पूर्वी व्यापारी केंद्र म्हणून प्रसिध्द होतं. १९६४ सालच्या चक्रीवादळात उध्वस्त झालं ते परत उभं राहिलंच नाही... त्सुनामी आली तेव्हा नुकसान व्हावं असं काही तिथे उरलंच नव्ह्तं. त्या ठिकाणी आधी मोठ्ठं रेल्वे स्टेशन होतं. रामेश्वरमच्याही आधीचं. ’बोट मेल’ नावाची रेल्वे एगमोरहून यायची. नावेच्या आकाराचे डब्बे चक्क समुद्रात उतरवले जायचे! तिथपर्यंत रेल्वे असणारी ’बोट मेल’ नंतर बोटीसारखीच समुद्रातून सिलोनला जायची... काकांनी बरीच माहिती पुरवली. आम्ही थक्क झालो. अब्दुल कलामांच्या या जन्मगावाने एकेकाळी एवढं ऐश्वर्य उपभोगलंय यावर विश्वास ठेवणं जड जात होतं. या विचारांच्या तंद्रीत आम्ही चेकपोस्टपाशी कधी उतरलो हे नीटसं कळलंच नाही. रामेश्वरमला जाणार्‍या बसमध्ये बसलो. खिडकीतून दिसत होती ती पांढरा प्रकाश फेकणारी ट्युबलाईट. संपूर्ण प्रवासातला तो एकमेव कृत्रिम दिवा होता आणि तोसुध्दा  जनरेटरच्या मदतीनं जळत होता. बस निघाली पण त्या भुताच्या  गावानं आम्हांला पुरतं पछाडलं होतं...

Picture 146 [50%]

(क्रमश:)