Thursday, May 12, 2011

करते व्याकुळ केव्हा…

नवलाख तळपती दीप विजेचे येथ,
उतरती तारकादळे जणू नगरात,
परी स्मरते आणिक करते व्याकुळ केव्हा
त्या माजघरातील मंद दिव्याची वात”
कुसुमाग्रजांच्या या ओळी आज पहिल्यांदाच वाचनात आल्या. त्या कुसुमाग्रजांच्या आहेत हेही त्याखाली छापलेल्या नावावरूनच कळाले. पहिल्या भेटीतच या ओळी मनापासून आवडल्या. या ओळी कुठल्या कवितेतल्या आहेतती कविता कुठल्या कवितासंग्रहातली आहेकोण्या विद्वानाने या कवितेचे समीक्षण किंवा रसग्रहण केले आहे का यांपैकी कुठलीही माहिती जाणून घेण्याची इच्छाही तेव्हा झाली नाही. एखादी गोष्ट पहिल्याच भेटीत का आवडली याचे स्पष्टीकरण देणे (अर्थात इतरांना) फारच अवघड असते असा माझा आजवरचा अनुभव आहे.
आवडलेल्या कवितेमधली प्रत्येक ओळ मला स्वतंत्र आणि सुंदर कवितेसारखीच भासते. ‘त्या माजघरातील मंद दिव्याची वात’ या ओळी वाचताच डोळ्यांसमोर एका दिव्यातली वात तेवताना दिसू लागली. फरक इतकाच होता की ती मंदपणे तेवत नव्हती तर तिच्या प्रखर दीप्तीने सभोवताल प्रकाशमान झाले होते. मला ना माजघर दिसलेना देवघरना तुळशीवृंदावन. मला दिसला तो फक्त तेज:पुंजाळलेला प्रकाश आणि तो ज्यामुळे जाणवत होता तो दिवा आणि त्यातील वात. तो दिवा कशावर स्थिर होतात्याचा रंगआकारत्यातील तेल काहीच दृगोच्चर झाले नाही.
काही क्षण असे संमोहनात घालवल्यावर माझ्या मनाने आजच्या तरुणासारखा ‘वास्तवदर्शक’ विचार करण्यास सुरुवात केली – एखाद्या मोठ्यागजबजलेल्या शहरात कवी जराशा उंच ठिकाणी उभा आहे जिथून त्याला सारे शहर दिसत आहे. सूर्य अस्ताला जाऊन बराच वेळ झाला आहेएव्हाना त्याने मागे सोडलेला रंगांचा पसाराही आवरलेला आहे. अशा या संध्याकाळीएकाकी असताना (‘एकाकी’ हे संख्यात्मक दृष्टीने) जुन्या आठवणी पिंगा घालत आहेत आणि कवी व्याकुळ होत आहे.
एकाकी हे संख्यात्मक दृष्टीने अशासाठी कीएकाकी असतानाच अशा आठवणी आणि त्यामुळे येणारी व्याकुळता शोभून दिसते. सुखदु:खाच्या आठवणी कधीही आणि कितीजणांतही उगाळता येतात परंतु असे व्याकुळ करणारे क्षण आठवण्यासाठीते शब्दबद्ध किंवा सुरबद्ध करण्यासाठी तेवढ्यापुरते का होईना एकाकी असावे लागतेया भौतिक जगाशी फारकत घ्यावी लागते.
सुखी आणि दु:खी या दोन परस्परविरोधी जाणिवांच्या अगदी जवळ जाऊनही अस्पर्श्य राहणारी व्याकुळता! तीमुळे कुणाला संपूर्णपणे दु:खी किंवा आनंदी होता येत नसावे पण म्हणून ही आरती प्रभूंच्या कवितेतली तटस्थपणे चालणारी नावही नाही.
दु:ख ना आनंदही अन्
अंत ना आरंभही
नाव आहे चाललेली
कालही अन् आजही”
यामुळे मला ही अत्यंत गूढभारलेली जाणीव भासते. हिचा शोध किंवा साक्षात्कार होण्यासाठी अकरावीत मराठीच्या पुस्तकात वाचलेली अरविंद गोखलेंची ‘कातरवेळ’ नावाची कथा कारणीभूत ठरली. ही कथा वाचल्यानंतर मला अचानक एकाकीपणाची जाणीव होऊ लागलीडोक्यात साचून राहिलेले सर्व विचार झर्रकन धुतल्या गेले त्यामुळे डोकं शांत झालं होतं. त्यावेळी योगायोगाने संध्याकाळच होती. मी थेट गच्चीत जाऊन बसलो. कुठलाही नवीन विचार करत नव्हतोदोन्ही हात गालांवर ठेवून आकाशात दूरवर कुठेतरी नजर लावून बसलो होतोनिळ्याजांभळ्या आकाशावर चांदण्यांची नक्षी उमटेपर्यंत. जेमतेम एक तासाचा तो काळ मी आयुष्यात कधीही विसरू शकत नाही. जीवन समृद्ध करणारे क्षण आपण क्वचितच विसरतो!
त्यानंतर असाच अनुभव आला तो ‘सांज ये गोकुळी’ ऐकताना. सुधीर मोघेंचे शब्द आणि आणि आशा भोसलेंचा स्वर. पुन्हा एकवार त्या व्याकुळतेच्या जाणीवेने माझे सीमित विश्व भारून टाकलेत्या अस्वस्थेशी लढण्यात अर्थ नव्हता त्यामुळे स्वतःला तिच्या स्वाधीन केले. तसे पहिले तर हे गाणे मी लहानपणापासून ऐकत आलोय पण त्यावेळी ते फक्त आवडायचे पण आता मात्र ते आवड्ण्याच्याही पलीकडे गेलेले आहे. कदाचित हा वयाच्या अंशतः परिपक्वतेचा आणि मला नव्यानेच लागलेल्या शोधाचा एकत्रित परिणाम असावा. त्यानंतर मी एक छोटासा प्रयोग करून पहिला. तेच गाणं मी इतर गायिकांच्या आवाजात ऐकलं पण काही परिणाम जाणवला नाही. सुधीर मोघेंचीच ‘फिटे अंधाराचे जाळे’ ही कविता श्रीधर फडकेंच्या आवाजात ऐकली परंतु तीत व्याकुळ करणारे काही जाणवले नाही.
गोखलेंची कथा वाचल्यावरत्यातही त्यातला शेवटचा परिच्छेद वाचल्यावर कातरवेळ आणि व्याकुळता यांचा काहीतरी संबंध असला पाहिजे असेही मनोमन वाटायचे. त्यामुळेच ‘या कातरवेळी पाहिजेस तू जवळी’ हे गाणंही ऐकलं पण तरीही अपेक्षित परिणाम साधल्या गेला नाही. आता लिहता लिहता अचानक आठवला तो दहावीतला गो.नी.दांडेकरांच्या ‘मृण्मयी’ या कादंबरीतून घेतलेला पाठ. त्यातली मानूतिचे बाबाऋणमोचनचा प्रवास आणि गाडगेबाबा... त्या भावविश्वानेही त्यावेळी मला असेच भारून टाकले होतेतेव्हा कळले नाही पण आता समजतंय की त्यावेळी जाणवणारी हुरहूर ही व्याकुळतेमुळेच आलेली होती. मन दु:खी करणारी नव्हती पण मनाला सुखावणारीही नव्हती.
त्यानंतर आज वाचलेल्या या कवितेच्या ओळीत्या वाचून मन व्याकुळ झालेपण परत सांगतो उदास नव्हेहा लेख पहिल्यांदा लिहून काढला तेव्हा चक्क दुपारचे दोन वाजले होते आणि बाहेर कडक उन पडले होते! यावरून माझ्यापुरती आणखी एक गोष्ट सिद्ध झाली की कातरवेळ आणि व्याकुळता यांचा संबंध म्हणजे एक हवाहवासा योगायोग असतो.
व्याकुळतेची जाणीव संपूर्णपणे व्यक्तीसापेक्ष आहे. कुठली घटनाकुठली वेळकुणाची आठवण कुणाला कधी व्याकुळ करेल ते सांगता येतच नाही. पण व्याकुळता बहुतांशी लोकांना दु:खी करते हे मात्र खरे!
-------------------------------------------------------------------------
नवलाख तळपती दीप विजेचे येथ
उतरली तारकादळे जणू नगरात
परि स्मरते आणिक करते व्याकुळ केव्हा
त्या माजघरातील मंद दिव्याची वात
वाऱ्यावर येथिल रातराणी ही धुंद
टाकता उसासेचरणचाल हो मंद
परि स्मरतो आणिक करतो व्याकुळ केव्हा
त्या परसामधला एकच तो निशिगंध
हेलावे भवती सागर येथ अफाट
तीरावर श्रीमान इमारतींचा थाट
परि स्मरतो आणिक करतो व्याकुळ केव्हा
तो नदीकिनारा आणि भंगला घाट
बेहोष चढे जलशांना येथिल रंग
रुणझुणता नूपुर जीव बने निःसंग
परि स्मरतो आणिक करतो व्याकुळ केव्हा
तो आर्त मला जो ऐकविलास अभंग
लावण्यवतींचा लालस येथे विलास
मदिरेत माणकापरी तरारे फेस
परि स्मरती आणिक करती व्याकुळ केव्हा
ते उदास डोळेत्यातील करुण-विलास
                                         कुसुमाग्रज
---------------------------------------------------------------------------
ता.क.: इंटरनेट वर ‘व्याकुळ’, ‘त्या माजघरातील मंद दिव्याची वात’, ‘कातरवेळ’ याविषयीचे बरेच लेख दिसले. एकाच विषयावरकवितेवर एवढे विविधांगी लेखमतप्रदर्शन पाहून छान वाटते. या कवितेचं गाण्यातही रुपांतर झालेले आहे अशी माहिती मिळाली परंतु कुठे सापडले नाही.

3 comments:

  1. सी. रामचंद्र यांनी गायलं आहे - https://www.youtube.com/watch?v=Z9Ru_KaW_ac

    ReplyDelete
  2. मुलुंडचे श्री गोपुजकर यानी त्यास संगीत दिले असून किशोर देशमुख यांनी ते गायले आहे.

    ReplyDelete