Thursday, March 24, 2016

कुपात्री दान?

दात्याने दान कोणाला द्यावे हा त्याचा वैयक्तिक प्रश्न असला तरीही ते दान सत्पात्री असावे अशी एक अपेक्षा आपल्या संस्कृतीत केली गेली आहे. आता सत्पात्री किंवा कुपात्री याचक कोण हे ठरवणारी कुठलीही अधिकृत संस्था किंवा प्रणाली अस्तित्वात नसल्याने बहुतेकवेळा दात्याच्या बौद्धिक आणि मानसिक कुवतीनुसारच याचकाला सत्पात्री अथवा कुपात्री ठरवल्या जाण्याची शक्यता अधिक असते.

दानाच्या महतीबरोबरच वादांचे महत्त्वही वादे वादे जायते तत्त्वबोध: म्हणून प्रतिपादित केल्या गेले आहे. भारतात अनादिकाळापासून सुरु असणाऱ्या सततच्या वैचारिक मंथनांमुळे ‘वाद’ हा शब्द आपणांस सुपरिचित आहे. परस्परविरोधी तात्विक विचारसरणींमधून निर्माण झालेल्या या वादांमुळे प्रत्येक विचारसरणीतील योग्य-अयोग्य, चांगल्या-वाईट बाबी कालानुरूप समाजासमोर येत गेल्या व त्यातून समाजाची वैचारिक श्रीमंती कमी जास्त होत गेली. पूर्वपक्ष व उत्तरपक्ष यांद्वारे वादांची समीक्षा आणि विवाद करण्याची परंपरा आता लुप्त होत असतानाही नवीन वाद निर्माण होणे थांबले नाहीत किंबहुना यापुढेही थांबणार नाहीत कारण वैचारिक वादविवाद हे सामाजिक जिवंततेचे एक लक्षण आहे.


डावीकडून रोहन मूर्ती व शेल्डन पोलॉक
वैयक्तिक देणगीतून उद्भवलेला असाच एक वैचारिक वाद ‘मूर्ती क्लासिकल लायब्ररी ऑफ इंडिया’ (Murty Classical Library of India) या उपक्रमाच्या निमित्ताने पुढे आला आहे. पारंपरिक विद्वत्ता विरुद्ध अपारंपरिक विद्वत्ता असे या वादाचे स्वरूप आहे. अमेरिकेतल्या कोलंबिया विद्यापीठातील भारतीय संस्कृतीचे (Indology) अभ्यासक व प्रसिद्ध संस्कृत पंडित डॉ. शेल्डन पोलॉक यांच्या प्रमुख संपादनाखाली भारतातील विविध भाषांमधील सुमारे ५०० प्राचीन ग्रंथांचा इंग्रजीत भाषांतर करण्याचा हा उपक्रम रोहन मूर्ती (नारायण मूर्तींचे चिरंजीव) यांच्या संकल्पनेतून व आर्थिक पाठबळातून साकार होणार आहे. प्रथमदर्शनी या उपक्रमाबद्दल कोणाच्याही मनात शंका उद्भवण्याचे कारण नाही किंबहुना एका पाशात्त्य विद्वानाच्या देखरेखीखाली आपल्या प्राचीन ग्रंथांचा अभ्यास केला जातोय हे पाहून नेहमीप्रमाणे आपले भारतीय मन सुखावण्याची शक्यताच अधिक!

रोहन मूर्ती यांनी त्यांच्याजवळील संपत्तीचा व्यय कसा करावा हा सर्वस्वी त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यात इतरांनी नाक खुपसण्याचे काही कारण नाही. परंतु प्राचीन भारतीय ग्रंथ हे आपणा सर्वांचे वैभव आहे, आपल्या संस्कृतीचे ते अविभाज्य घटक आहेत. त्यामुळे त्यांच्या भाषांतराची प्रक्रिया ही केवळ मूर्ती परिवार आणि काही पाशात्त्य विद्वान यांच्यापुरतीच मर्यादित राहून केवळ काही विशिष्ट हेतूने प्रेरित, विशिष्ट लोकांना अभिप्रेत असे या ग्रंथांचे भाषांतर केल्या जाऊ नये तर त्यात भारतीय पारंपरिक विचारांनाही स्थान देण्यात यावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे आणि त्यातूनच वरील वाद उद्भवला आहे. वरकरणी अत्यंत स्तुत्य भासणाऱ्या या उपक्रमाचे स्वागत न होण्यामागचे मुख्य कारण आहे, डॉ. शेल्डन पोलॉक यांची संस्कृत भाषा व भारतीय संस्कृतीबद्दलची मते आणि त्यायोगे त्यांनी काढलेले  काही निष्कर्ष -

१)   हिंदू राजे आणि प्रांतीय भाषांमुळे संस्कृत बाराव्या शतकाच्या आसपासच मृत झाली असून मुस्लीम राजांनी तिच्या पुनरुज्जीवनाचे प्रयत्न केले
२)   भारतीय उपखंडात संस्कृतचा प्रसार ब्राह्मण-राजसत्ता यांच्या एकत्र येण्यामुळे झाला
३)   संस्कृतच्या प्रभावाखाली राहावे लागत असल्याने संस्कृत आणि इतर भारतीय भाषांमध्ये तेढ निर्माण झाली
४)   संस्कृतात ‘उपजतच’ असलेल्या वंशवाद, वर्चस्ववाद आणि शोषणमूल्यांनी प्रेरित होऊन जर्मनीत नाझीवादाचा उगम झाला
५)   संस्कृतातल्या मौखिक परंपरेला आणि त्याद्वारे विकसित झालेल्या वेद, शास्त्र इत्यादींना महत्व देण्याचे कारण नाही
६)   वेदांतील कर्मकांड, यज्ञ, मंत्र इ. ब्राह्मण वर्चस्ववादाचे पुरावे आहेत
७)   वेद (परमार्थिक) आणि काव्य (व्यावहारिक) हे परस्परभिन्न असून काव्य लिखित स्वरूपात असल्याने त्यांचा अभ्यास करून त्यातील शोषणमूल्ये काढून टाकली पाहिजेत
८)   संस्कृतात लिखाणाची सुरुवात बौद्ध धर्मास प्रत्युत्तर म्हणून झाली
९)   रामायण ही बुद्धोत्तरकालीन निर्मिती असून त्याचा वापर आजतागायत हिंदूंचे मुस्लिमांवरील आक्रमण वैध ठरवण्यासाठी केला जातो
१०)   राजांना देवत्व प्राप्त करवून देण्यासाठी राजाश्रयाखाली राहणाऱ्या ब्राह्मणांनी ‘सत्तेच्या सौंदर्यीकरणा’द्वारे (aestheticization of power) विविध संस्कृत ग्रंथ रचले इ.

The Battle for Sanskrit या पुस्तकाचे मुखपृष्ठ
भारतीय पारंपरिक विचारसरणीत बसत नसल्याचे सोपे कारण देऊन वरील निष्कर्ष दुर्लक्षून चालणार नाहीत कारण ती अभ्यासाअंती काढलेली आहेत. प्रथम ग्रीक आणि लॅटिन भाषांचा अभ्यास केलेल्या पोलॉक यांनी उर्वरित आयुष्य संस्कृत व भारतीय संस्कृतीच्या अभ्यासासाठी वाहून घेतले आहे. संस्कृत भाषेवरचे त्यांचे प्रभुत्त्व वादातीत आहे आणि त्यामुळेच त्यांच्या विचारांना प्रतिवाद करणेही आवश्यक ठरते. संस्कृतभारतीचे चमू कृष्ण शास्त्री, के.एस.कन्नन यांनी याची सुरुवात केली. J. Hanneder यांचा ‘On “The Death of Sanskrit”’ हा निबंधही या संदर्भात वाचण्यासारखा आहे. राजीव मल्होत्रा यांचे ‘The Battle for Sanskrit’ हे पुस्तक हार्पर कॉलिन्स या प्रकाशन संस्थेने नुकतेच प्रकाशित केले आहे ज्यात त्यांनी पोलॉक यांच्या विचारांचे अभ्यासपूर्ण वैचारिक खंडन केले आहे. या पुस्तकाच्या उपशीर्षकातूनच (Is Sanskrit political or scared? Opressive or liberating? Dead or alive?) उद्धृत विषयाचा परीघ लक्षात येतो. जिज्ञासूंनी हे पुस्तक जरूर वाचावे. हा लेख लिहण्यामागची प्रेरणा सुद्धा हेच पुस्तक आहे.

पोलॉक यांच्या विरोधामागे आणखी एक प्रबळ कारण आहे ते भारताविषयक त्यांनी वेळोवेळी व्यक्त केलेली खंबीर राजकीय मते. काँग्रेसचे सरकार असताना नरेंद्र मोदी विरोधात आणि आता भारत सरकारच्या एकंदरीत कार्यपद्धतीविरुद्ध (जेएनयु प्रकरणासहित) आजवर किमान पाच आणि तत्सम पंधरा ‘इंटरनेट अर्जां’वर (online petitions) स्वाक्षरी करणाऱ्या पोलॉक यांचा काँग्रेसप्रणित युपीए सरकारने २०१० साली ‘पद्मश्री’ देऊन ‘यथोचित’ गौरव केलेला आहेच. अभ्यासकांना राजकीय मते असण्यात काही गैर नाही. परंतु तात्कालिक घटनांचा आपल्या राजकीय विचारांशी सुसंगत असा सोयीचा अर्थ लावून आपले निष्कर्ष कसे बरोबर आहेत हे पटवून देणे अभ्यासकाच्या भूमिकेला साजेसे नाही. रामायणाची ऐतिहासिकता नाकारतानाच त्यात उद्धृत खगोलीय घटनांकडे संपूर्ण दुर्लक्ष करणे व राम रावणातील युद्धाचा संदर्भ देत बाबरी प्रकरण, भारतात मुस्लिमांवर होणारे हल्ले, अत्याचार रामायणावरून प्रेरित आहेत असे म्हणणे त्यामुळेच अयोग्य आहे.

प्राचीन भारतीय परंपरेचा आधिदैविक, आधिभौतिक आणि आध्यात्मिक असा विचार न करता दैविक आणि आध्यात्मिक अंगांना तसेच शास्त्रांना ‘समस्या’ म्हणून वगळणे, यज्ञ, मंत्र आणि मौखिक परंपरेचे महत्व आणि जमल्यास अस्तित्वच अमान्य करणे  अशा विचारसरणीतून होणारे संस्कृत ग्रंथांचे इंग्रजी भाषांतर कितपत योग्य मानावे हा प्रश्न आहे. वेदांतील सूक्ते, उपनिषदांतील शांतीमंत्रे, पातंजल योगसूत्रे, सौंदर्यलहरी यांचे भाषांतर होणार की नाही ते माहित नाही परंतु मंत्रांचे मूळ उच्चारात असल्यामुळे त्यांच्या भाषांतरातून अर्थवजा माहितीपेक्षा अधिक काही मिळण्याची अपेक्षा नाही.

मूर्ती क्लासिकल लायब्ररीची काही पुस्तके
ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीच्या स्थापनेनंतर काही वर्षांतच विशिष्ट ध्येय ठेवून पौर्वात्य अभ्यासाच्या (Oriental studies) च्या नावाखाली युरोपीय दृष्टीकोनातून भारतीय संस्कृतीच्या अभ्यासाची सुरुवात झाली. सर विलियम जोन्स या कायदेपंडित अभ्यासकाने ‘देवभाषे’ऐवजी ‘भाषा’ व ‘देवनागरी’ऐवजी ‘नागरी’ असे शब्द प्रचलित करण्यास सुरुवात केली. पुढे मॅक्समुल्लर वगैरे विद्वानांनी आर्य-द्रविडवाद अलगदपणे आणला आणि आर्यांना 'बाहेरून आलेले' ठरवण्यात आले. दुर्दैवाने बऱ्याच भारतीय अभ्यासकांनीही हेच मत प्रतिपादले. लोकमान्य टिळकांच्या The Arctic Home in the Vedas, राहुल सांकृत्यायन यांच्या ‘वोल्गा ते गंगा’ किंवा अलीकडचे डॉ. अमर्त्य सेन यांच्या The Argumentative Indian सारख्या पुस्तकांतून हीच बाब अधोरेखित होते. याचाच परिपाक संस्कृत भाषेला आर्यभाषा म्हणून परदेशी भाषा ठरवण्यात झाला. अर्थात हा वाद आजही जिवंत असून आर्य हे भारतीयच होते अशा आशयाचे नवीन पुरावे, DNA reports आता उपलब्ध आहेत. 

संस्कृत ही भारतीय भाषांची जननी किंवा मोठी बहिण नसून त्यांच्यात प्रचंड तेढ होती. ब्राह्मण- राजसत्तेच्या वरदहस्तामुळेच संस्कृतने इतर भारतीय भाषांवर प्रभुत्व गाजवले व त्यांना विकसित होण्याची पुरेशी संधी दिली नाही असा पोलॉक, त्यांचे विद्यार्थी व यांना मानणाऱ्या गटाचा आक्षेप आहे त्यामुळेच कदाचित मूर्ती क्लासिकल लायब्ररीद्वारे प्रादेशिक भारतीय भाषांतील पुस्तकांना अधिक महत्व देण्यात येत आहे. आतापर्यंत अशी नऊ पुस्तके भाषांतरित झाली आहेत. परंतु भाषांतरकारांचा एकूण दृष्टीकोन लक्षात घेता त्यांना सर्वच भारतीय भाषांत आढळणारे संस्कृतोद्भव शब्द (संस्कृत की तमिळ हा वाद लक्षात घेऊनही) त्यांच्या सुयोग्य अर्थाने इंग्रजीत आणणे जड जाईल असे दिसते. उदाहरणार्थ धर्म = religion, ईश्वर = God, आत्मन = soul, देवमुर्ती = idol, शक्ती = Holy Spirit, यज्ञ = sacrifice, शिव = destroyer, माया = illusion, मिथ्या = spurious, मोक्ष = salvation इ. भाषांतर सध्या प्रचलित असले तरी ते सुयोग्य नाहीत. नुकत्याच एका तेलुगु वाचकाने मूर्ती क्लासिकल लायब्ररीद्वारे तेलुगुतून इंग्रजीत भाषांतरित करण्यात आलेल्या ‘मनुचरित्र’ (The Story of Manu) या पुस्तकातील काही दोष दाखवून दिले आहेत. या वाचकाच्या मते कित्येक वाक्प्रचारांना सोयीने वगळण्यात आले आहे किंवा त्यांचा चुकीचा अर्थ लावण्यात आला आहे. ब्रह्मदेव = The Supreme God किंवा The God Creator, घोर वनप्रदेश = God forsaken place तसेच इतर काही तेलुगु शब्द चुकीचे भाषांतरित करण्यात आले आहेत असे त्यांचे म्हणणे आहे. एकंदरीतच हे भाषांतराचे काम ‘भारतीय भाषा’ ते ‘इंग्रजी’ असे शब्दकोश पुढे ठेवून केल्या जाणाऱ्या भाषांतरापेक्षा वेगळे न ठरल्यास त्यात आश्चर्य नाही.

सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास पोलॉक यांच्या मुख्य संपादनाखाली झालेले हे भाषांतर म्हणजे सत्यनारायणाच्या पोथीवर अजिबात विश्वास नसणाऱ्यांनी स्वत: सत्यनारायण करून गावजेवण घालण्यासारखे आहे. आपल्याकडे रामायणाला इजिप्तमध्ये नेऊन बसवणारे, प्रत्येक ऐतिहासिक ग्रंथ व त्यातील पात्रांना ‘myth’ च्या धुक्यात लपेटणारे, महाभारतातील युद्ध हा शैव-वैष्णव यांतील संग्राम मानणारे तथाकथित विद्वान बरेच आहेत. वेंडीबाई डॉनीगर बद्दल तर बोलायलाच नको! या भाऊगर्दीपेक्षा शेल्डन पोलॉक यांची विद्वत्ता वरची आहे. त्यामुळेच त्यांची स्वत:ची मते व त्यांच्याच संपादनाखाली चालणाऱ्या भाषांतर प्रकल्पातील उणीवा, दोष दाखवून देण्यासाठी तितक्याच वैचारिक प्रगल्भतेची आणि अभ्यासाची गरज आहे. केवळ तोंडाला शाई फासणे, उथळ चर्चा करणे किंवा याकडे संपूर्ण दुर्लक्ष करण्याएवढे हे सोपे नक्कीच नाही.

सध्या change.org या संकेतस्थळाच्या माध्यमातून पोलॉक यांना या संपादकपदावरून हटवावे अशी मागणी करणारी एक मोहीम चालवली जात आहे. लोकसत्ता या अग्रगण्य दैनिकाने एका जळजळीत अग्रलेखाद्वारे (हटाववादी हुच्च्पणा) या मोहिमेचे वाभाडे काढले परंतु पोलॉक यांना विरोध का केल्या जात आहे ते मुळातून समजून घेण्याची आवश्यकता दाखवली नाही. ‘पद्मश्री’ पोलॉक यांची मुख्य संपादकपदावरून गच्छंती करणे तत्सम एका इंटरनेट अर्जाद्वारे शक्य नाही हे न कळण्याइतपत ‘१३२ विद्वान’ ज्यांनी ही मोहीम सुरु केली आणि त्यांचे ‘१७४५० नाव गाव नसणारे पाठीराखे’ दुधखुळे नक्कीच नाहीत. या अर्जाचा मुख्य उद्देश डॉ. पोलॉक यांचे संस्कृत व संस्कृतीबद्दलचे निष्कर्ष समाजासमोर आणून त्यावर चर्चा घडवणे हा आहे, जो बऱ्याच अंशी यशस्वी झाला आहे. याविषयीचे अनेक लेख विविध इंग्रजी दैनिकांतून प्रकाशित होत आहेत परंतु प्रादेशिक भाषांमधील लेखांची नेहमीप्रमाणे वानवा आहे. मुळात मूर्ती क्लासिकल लायब्ररी किंवा त्याद्वारे केल्या जाणाऱ्या भाषांतराला विरोध नसून या उपक्रमाचे मुख्य संपादकपद भूषवणाऱ्या डॉ. शेल्डन पोलॉक यांच्या वैचारिक भूमिकेला आहे. तसेच हा उपक्रम बंद करण्याचा हेतू नसून लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याचा आहे. स्वदेशी की विदेशी असेही या वादाचे स्वरूप नाही.

शेवटी मूर्ती क्लासिकल लायब्ररीला हार्दिक शुभेच्छा देऊन एकच अपेक्षा आपण व्यक्त करू शकतो की या उपक्रमाद्वारे भाषांतरित होणारे ग्रंथ शेल्डन पोलॉक यांना अभिप्रेत असणाऱ्या अर्थाऐवजी मूळ ग्रंथांशी इमान राखणारे असावेत ज्यायोगे रोहन मूर्तींचे दान कुपात्री ठरणार नाही.

टीप: डॉ. पोलॉक यांनी लिहिलेल्या अभ्यासलेख व पुस्तकांची यादी मोठी आहे. तरी इच्छुकांनी खालील काही संदर्भ नक्कीच बघावेत.
  1. Pollock, Sheldon. 1985. ‘The Theory of Practice and The Practice of Theory in Indian Intellectual History’. Journal of the American Oriental Society, 105 (3): 499.
  2. Pollock, Sheldon. 1993b. ‘Ramayana and Political Imagination in India’. The Journal of Asian Studies, 52 (2) 261.
  3. Pollock, Sheldon. 2001b. ‘The Death of Sanskrit’. Comparative Studies in Society and History, 43 (2): 392.
  4. Pollock, Sheldon. 2006. The Language of The Gods in The World of Men. Berkeley: University of California Press.
  5. Pollock, Sheldon. 2006. ‘Crisis in The Classics’. Journal of Social Research, 78 (1): 21.

14 comments:

  1. ही पोलॉक यांच्या बद्दलची मांडणी आणि त्यावर असणारे आक्षेप मराठीत यावेत ही खूप समाधानाची बाब आहे कारण मराठी माणूस या बाबतीत अनभिज्ञ आहे.राजीवजींच्या विचारांवर व मांडणीवर - वाचणाऱ्या आणि अनुकूल मते व्यक्त करणाऱ्या व्यक्तींमध्ये मराठी मनसे फारच कमी आढळतात.तेंव्हा हे मराठीत त्यांच्या पर्यंत पोचणे गरजेचे आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद!

      Delete
  2. लेखकाने ह्या लेखात अतिशय सुंदर रीतिने योग्य अभिप्राय मांडला आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. आवर्जून प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद

      Delete
  3. डॉ. शेल्डन पोलॉक यांची संस्कृत भाषा व भारतीय संस्कृतीबद्दलची मते आणि त्यायोगे त्यांनी काढलेले काही निष्कर्ष अतिशय सुयोग्य आणि प्रासादिक शब्दांत मांडून आपण मराठी भाषिकांना ऋणी केले आहे. एकाच शब्द प्रयोग मला खटकला. तो म्हणजे ‘सत्तेचे सौंदर्यीकरण (aestheticization of power).’ माझ्या अंदाजाप्रमाणे येथे पोलॉकना aestheticization of power चा अर्थ/आशय ‘सत्तेची कटुता कलेच्या गोडीने झाकणे’ असा अभिप्रेत असावा. जितके शक्य असेल तितके श्री मल्होत्रा यांचे लेखन आपण मराठीत उपलब्ध करून द्यावे हि विनंती,

    ReplyDelete
    Replies
    1. श्रीनिवासजी,
      लेख काळजीपूर्वक वाचल्याबद्दल धन्यवाद. Aestheticization of Power चा आपणास अभिप्रेत असलेला अर्थ अगदी योग्य आहे.
      ज्याप्रमाणे रंगरंगोटी करून आकर्षक व सुंदर बनवल्या गेलेल्या चेहऱ्याची खरी ओळख पटवणे अवघड जाते तद्वतच सत्ताधीशांचा स्वार्थ व त्यातून निर्माण होणारे क्रौर्य झाकण्यासाठी तसेच हे प्रजेच्या लक्षात आल्यास पेटणारा संभाव्य उठाव टाळण्यासाठीच काव्य, नाट्य, संगीत आदींची मदत घेतली गेली (प्रसंगी निर्मिती करण्यात आली) असा पोलॉक यांचा निष्कर्ष आहे.
      काव्य, नाट्य इत्यादींचा वापर सौंदर्य प्रसाधनांसारखा करून राजाचे महत्त्व वाढवण्यात आले ही पोलॉकप्रणीत बाब ठळकपणे दृगोच्चर करण्यासाठीच मी 'सौंदर्यीकरण' हा शब्द योजला आहे. याऐवजी दुसरा चपखल बसणारा शब्द सापडल्यास तो वापरता येईल.

      Delete
  4. Excellent article Anandji. Please can you post this on Loksatta as a rejoinder to their original article. You have expressed your views in a very balanced way, something which we need to learn as participants in a debate. It is also quite amusing to know that Nazism was inspired by Sanskrit literature. Pollock refers to this as deep Orientalism which is deeply offensive to our culture. Equally interesting is to know that muslim rulers encouraged Sanskrit studies in which is the premise of the first reference you have included in your list. It will be good to also underline the fact that Sanskrit is not just a language, but fountainhead of our Sanskrit.

    ReplyDelete
  5. Hi Anand,
    It is really a nobel idea to create this platform and wish you all the best. Thank you.
    Vishnu

    ReplyDelete
  6. I am Arun Hiremath, This is very Facinating article... I have added it to my FB Page with this blog spots links... Apologies for not asking for permission for this...

    Below is the link... Will also share this info with as many as people I can through Whats App and my other FB Pages...

    https://www.facebook.com/We-need-change-181298328717843/?fref=nf

    ReplyDelete
    Replies
    1. Arunji,
      No apology needed at all! I am thankful to you for sharing the article.

      Delete
  7. सुंदर लेख आनंद! काही दिवासपूर्वी राजीवजींवर वाङमय चौर्याचे आरोप झाले होते त्यात किती तथ्य होये यावर पण लेख लिहिलातर खरी परिस्थिती कळेल.

    ReplyDelete
    Replies
    1. स्वप्नील, लेख आवडल्याचे कळवल्याबद्दल धन्यवाद!

      राजीव मल्होत्रांवर करण्यात आलेल्या वाङ्मयचौर्याच्या निराधार आरोपांविषयी एकदा सविस्तर लिहीनच. परंतु तूर्तास खालील प्रमुख मुद्दे मांडत आहे.

      १. मुळात स्वत: राजीव मल्होत्रांचाच व्यासंग इतका दांडगा आहे की त्यांना वाङ्मयचौर्याची काहीही गरज नाही. त्यांची पुस्तके, लेख किंवा व्याख्यान ऐकलेल्यांना याची प्रचीती नक्की येईल.
      २. भौतिकशास्त्रात उच्चविद्याविभूषित असल्याने ते संदर्भ आणि पुराव्याचे महत्त्व अधिक चांगल्या प्रकारे जाणतात.
      ३. ज्या Andrew J Nicholson यांच्या Unifying Hinduism या पुस्तकातील काही वाक्ये वापरल्याचा मल्होत्रांवर आरोप आहे, त्या Nicholson यांचे नाव Indra's Net या पुस्तकात किमान ३४ वेळा येते आणि यात १२ संदर्भ हे Nicholson यांच्या वरील पुस्तकातील आहेत. वाङ्मयचोरी करणारा त्याच पुस्तकाचे संदर्भ का देईल आणि तेही १२ वेळा ?... याचे उत्तर आरोप करणाऱ्यांजवळ नाही.
      ४. मुख्य बाब अशी की, स्वत: Nicholson यांच्याऐवजी इतर तिऱ्हाईतांनी यात जास्त लक्ष घातले. त्याची कारणे मल्होत्रांच्या कार्याविषयी माहिती असलेल्या सर्वांना ठाऊक आहेतच.

      प्रत्यक्षात काय झाले ?

      १. Nicholson यांची काही वाक्ये अवतरण चिन्हांत टाकायची राहून गेली (असे एकूण तीनदा झाले) आणि त्यावरून वाङ्मयचौर्याचा आळ घेण्यात आला. ही प्रत्यक्षात संकलनातील चूक होती हे दोन्ही पुस्तकांच्या प्रकाशन संस्थेमधील पत्रव्यवहारानुसार स्पष्ट झाले.
      २. Columbia University Press (Unifying India चे प्रकाशक) आणि Harper Collins (Indra's Net चे प्रकाशक) यांच्यातील परस्पर सामंजस्य करारानुसार अवतरण चिन्हे न वापरल्याची त्रुटी 'वाङ्मयचौर्याच्या' (plagiarism) कक्षेत येत नाही.
      ३. केवळ अनावधानाने झालेली चूक पुढील आवृत्तीत दुरुस्त करण्याचे ठरले. परंतु तरीही वाङ्मयचौर्याचे आरोप थांबले नाहीत तर भारतीय डाव्या विचारसरणींच्या काही लोकांकडून ते हेतुपुरस्सर पसरवले गेले. (TISS मधील मल्होत्रांच्या भाषणावेळी तेथील काही विद्यार्थ्यांनी जो गोंधळ घातला तो सूचक आहे)
      ४. वाङ्मयचौर्याचे आरोप करणाऱ्या कुणालाही न्यायालयात रीतसर याचिका दाखल करण्याचे आव्हान मल्होत्रांनी केले. परंतु कुणीही अशी याचिका दाखल करू शकले नाही. उलट ट्विटर सारख्या समाजमाध्यमातून अधूनमधून आरोप करणे मात्र सुरूच ठेवण्यात आले.
      ५. प्रत्यक्षात Nicholson यांनी जी धर्मविषयक पुस्तके वाचून स्वत:चे पुस्तक लिहले त्यात त्रोटक ठिकाणीच मूळ धर्मग्रंथांचा संदर्भ दिला होता जेणेकरून धर्मग्रंथांची पुरेशी माहिती नसणाऱ्या व्यक्तीला ती Nicholson यांचीच मते वाटावीत.
      ६. शेवटी या सर्वांस प्रत्युत्तर म्हणून मल्होत्रांनी Indra's Net च्या पुढील आवृत्तीतून Nicholson संबंधी सर्व संदर्भ काढून टाकत त्या जागी मूळ भारतीय ग्रंथांचा संदर्भ देत असल्याचे जाहीर केले आणि ती सुधारित आवृत्तीही आता प्रकाशित झाली आहे.

      Delete