निराशा तिची व्याप्ती सतत वाढवत चालली आहे. दु:ख आणि दैन्य यांनी
चराचर व्यापल्याची जाणीव गडद होते आहे. आपल्याच सीमित परिघात रत झालेल्या
बहुतेकांना व्यर्थ सुरक्षिततेची भावना सुखी करत आहे परंतु या येणाऱ्या काळोखाची
व्याप्ती आणि तिचं गांभीर्य, संपूर्ण विश्व व्यापून टाकण्याच
तिचं सामर्थ्य त्यांच्या लक्षात आलेलं नाही. हे जेव्हा त्यांच्या लक्षात येईल
तोपर्यंत बहुतेक उशीर झालेला असेल. ज्या थोड्या लोकांना हे समजले आहे त्यांच्याकडे
केवळ दोन पर्याय उरलेत. पहिला म्हणजे या निराशेच्या अधीन होणे आणि दुसरा म्हणजे
शक्य होईल तिथवर तिच्या विरोधात उभे ठाकणे. यांपैकी पहिल्या पर्यायात कुठल्याही
उपपर्यायाची शक्यता नाही कारण तिथे विरोध करण्याची प्रक्रियाच नाही, आहे ते परिस्थितीला शरण जाणे. दुसऱ्या पर्यायात मात्र एक छुपी वाट आहे -
पळवाट. स्वतःला सिद्ध करण्याच्या प्रयत्नांत, निराशेविरोधात
लढण्यावेळी स्वतःच्या सीमित क्षमतेची जाणीव होताच अचानक दृगोच्चर होणारी पळवाट. ही
वाट निवडताच निराशेविरोधात लढण्याची गरज आणि कारण दोन्ही संपून जातात. संपूर्ण
सृष्टीला आपल्या काळकवेत घेणाऱ्या निराशेला आपण शोधलेली पळवाट सापडली नाही म्हणून
आनंदी होणारे लोक. त्यांना हे समजत नाही की त्यांच्या जगण्याचं कारणच संपलं आहे,
लढाई करता करता त्यांनी आपसूकच शस्त्रे ठेवून दिली आणि ते निराशेला
शरण गेले. शरण आलेल्यांवर वार केल्या जात नसतो.
सभ्यतेचे बुरखे टराटरा फाटत आहेत. आदर्शांची राखरांगोळी होते आहे, ज्यांवर विश्वास ठेवला तेच सर्वांत मोठे घातकी निघत आहेत. जवळचे दूर गेलेत आणि कशाचाच कशाशी संबंध नसणारे, लटांबर घेऊन आसपास गर्दी करत आहेत. गुरु म्हणून कुणाला बघावं तर तो गुरुघंटाल निघतोय.
मातृभूमी, देशभक्ती, मातृभाषा या शोकेस मध्ये शोभणाऱ्या काचेच्या ठिसूळ वस्तू बनून राहिल्या आहेत. जरा कुठे धूळ बसलीये म्हणून पुसण्याचा प्रयत्न करावा तर खळ्ळकन तुकडेच हातात येत आहेत. नव्याने आलेल्यांना त्यामुळेच शोकेस उघडण्याचीही परवानगी नाही आणि काहीवेळेस बघण्याचीही. केवळ काही ठराविक दिवशी त्या नाजूक वस्तू बाहेर काढून ठेवल्या जातात, त्यांवरची धूळ काळजीपूर्वक पुसल्या जाते, अभावाने डागडूजी केली जाते आणि त्या वस्तू परत शोकेस मध्ये ठेवून दिल्या जातात. हे सारं कुणी करावं त्याचेही निकष ठरलेले आहेत. या निकषांमध्ये न बसताही या कामांत ढवळाढवळ करणाऱ्यांना चाबकाने फोडून काढले जात आहे. ज्या लोकांची पायदळी तुडवण्याची लायकी नाही ते डोक्यावर येऊन बसले आहेत. इतर काहींचा नंगानाच सुरू आहे आणि त्याखाली भरपूर लोक दाबून मरत आहेत. त्यातून वाचलेले त्याच बीभत्स आणि रक्तपिपासू लोकांच्या नाचात सामील होण्यासाठी धडपड करत आहेत आणि यातही कित्येकांना मरण येत आहे.
हे विश्व कधीही शांत नव्हतं. ज्याची उत्पत्तीच स्फोटातून झाली आहे ते
शांत कसे असेल? सदैव अशांत, अतृप्त आणि
त्यामुळेच दु:खी. सत्ता भोगण्याची लालसा आणि त्यापायी आलेली उन्मादकता हे एकच सत्य
ठळकपणे कालातीत भासत आहे आणि तसे प्रयत्न केले जात आहेत. लढायांना, यु्ध्दांना नैतिकतेच्या, सत्याच्या, देशप्रेमाच्या, कधी अन्यायाच्या खोट्या आणि बनावट
कोंदणात बसवून त्यांना प्रकाशमान करण्याचा प्रयत्न होतोय. इतिहासात डोकावून
कुठल्याही लढाईचे संदर्भ दोन्ही बाजूंनी तपासा. आपला योद्धा तो त्यांचा कैदी,
आपला आदर्श तो त्यांचा गद्दार, आपल्यासाठी परमपूज्य
तो त्यांच्यासाठी फितूर, आमचा तारणहार तो त्यांच्यासाठी
फरारी, आमचा धर्मप्रचारक तो त्यांच्यासाठी इतर धर्माचा अपमान
करणारा. अवघे विश्व अनादी कालापासून अशा विरोधाभासांनी भरलेले आहे. यात सारेच ओढले
गेलेत. जे काही अपवादाने बाजूला राहू शकले त्यांनी नवनिर्मिती केली, नवीन कल्पना मांडल्या, त्यांना मूर्त स्वरूप दिले.
सुंदर वाटावे अशा प्रतीविश्वाची निर्मिती केली परंतु हे सुंदर प्रतीविश्व सुद्धा
याच उपभोगी विश्वात त्यांना उभं करावं लागलं. बऱ्याच काळापर्यंत ते टिकून होतं,
कालपरत्वे संकुचित होत गेलं पण टिकून होत. आता मात्र त्याच्या
अस्तित्वाबाबत आता शंका येऊ लागली आहे.
मुर्ख लोकांनी तयार केलेली बाग आणि त्याहून मुर्ख असणाऱ्यांचे त्यात मनसोक्त फिरणे एवढेच आता शिल्लक आहे. काही मूठभर लोकांच्या अनुभूतीला खरे मानून आपले विलासी, अतृप्त जीवन सुंदर करायला निघालेल्या माणसांचा त्या अनुभूतीला स्पर्शही होत नाही कारण ती त्यांच्यासाठी निर्माण झालेली नसते आणि या अथक आणि तरीही व्यर्थ प्रयत्नांचे फळ म्हणून मिळते ते आणखी विलासी आणि अतृप्त जीवन. दिसत आहेत ते अवशेष, मस्तकाविना धडाचे, तेही असंख्य. भूतकाळात धर्मप्रसाराच्या ‘नैतिक’ अधिष्ठानाच्या पोकळ सोंगापायी भव्य, सुंदर मुर्त्यांचा बळी गेला आणि आता आपली पाळी आली आहे.
No comments:
Post a Comment