Thursday, February 3, 2011

"तुम्ही का लिहिता?"

'Other Colours' या
पुस्तकाचे मुखपृष्ठ
तुर्की लेखक ओरहान पामुकने साहित्याचे नोबेल पारितोषिक स्वीकारताना दिलेल्या My Father’s Suitcase या दीर्घ भाषणातील एका भागाचा हा स्वैर अनुवाद. (हे संपूर्ण भाषण Other Colours या पुस्तकात दिलेले आहे)

तुम्हा सर्वांना माहितीच असेल की लेखकांना जास्तीत जास्त वेळा विचारण्यात येणारा, आवडता प्रश्न असतो तो - "तुम्ही का लिहिता?"

मी लिहितो कारण लिहिणे ही माझी आंतरिक गरज आहे. मी लिहितो कारण मला अन्य लोकांसारखी नेहमीची कामे करता येत नाहीत. मी लिहितो कारण मी लिहिलेल्या पुस्तकांसारखी इतर पुस्तके मला वाचायची असतात. मी लिहितो कारण मी तुमच्यावर रागावलोय, मी सर्वांवरच रागावलोय. मी लिहितो कारण मला एका खोलीत दिवसभर बसून लिहायला आवडतं. मी लिहितो कारण वास्तविक आयुष्यात बदल करूनच मला त्यात सहभागी होता येतं. मी लिहितो कारण इस्तंबूल, तुर्कस्तानात आम्ही कशा प्रकारचे जीवन जगलो आणि आजही जगतो आहोत हे इतरांना, आपणा सर्वांना, संपूर्ण जगाला कळावं अशी माझी इच्छा आहे. मी लिहितो कारण इतर कशावरही नाही इतका विश्वास मला साहित्यावर आणि कादंबरी लिहिण्याच्या कलेवर आहे. मी लिहितो कारण पेपर, पेन आणि शाईचा वास मला आवडतो. मी लिहितो कारण ती एक सवय आहे, एक आत्यंतिक उर्मी. मी लिहितो कारण मी विस्मरणात गेल्याची भीती मला सतत वाटत असते. मी लिहितो कारण त्यातून मिळणारा सन्मान आणि उत्साह मला आवडतो.

स्वतःला एकांतात ठेवण्यासाठी मी लिहितो. फक्त तुमच्यावरच नाही तर इतर सर्वांवरच मी इतका जास्त का रागावलोय हे मला लिहिण्यातून उमजेल असं वाटतं, कदाचित त्यामुळेच मी लिहितो. मी लिहितो कारण इतरांनी ते वाचलेलं मला आवडतं. मी लिहितो कारण एकदा लिहायला घेतलेलं पान, निबंध, कादंबरी मला पूर्ण करायची असते. मी लिहितो कारण सर्वजण मी काहीतरी लिहावं अशी अपेक्षा करत असतात. मी लिहितो कारण ग्रंथालयांच्या चिरतरुणतेवर आणि कप्प्यांवर विराजमान झालेल्या माझ्या पुस्तकांवर माझा भाबडा विश्वास आहे. गोष्ट सांगण्यासाठी नव्हे तर ती तयार करण्यासाठी मी लिहितो. मी लिहितो कारण आयुष्यातल्या सुंदर, भव्य आणि उत्तम गोष्टींना शब्दरूप देणं मला खूपच उत्साही करतं. स्वप्नात एखाद्या ठिकाणी जसं जाता येतं अगदी तसंच खरंखुरं जाता येत नाही आणि या दु:खद, दुर्दैवी शक्यतेपासून लांब राहण्यासाठीच मी लिहितो.

मी लिहितो कारण मला कधीच आनंदी होणं जमलं नाही. मी लिहितो कारण मला आनंदी व्हायचंय.



No comments:

Post a Comment