Wednesday, January 19, 2011

आईसगोला…

गडद हिरवा रंग फासलेला लाकडी गाडा, त्यावर तेवढ्याच गडद रंगातलं छोटेखानी यंत्र लावण्यात आलंय, त्या यंत्रात बर्फाचा चौकोनी तुकडा दाबून बसवण्यात आलाय, गाड्यावर मुद्दाम तयार करवून घेतलेल्या खाचांमध्ये/स्टॅंडमध्ये ठेवलेल्या काचेच्या बाटल्यांतलं रंगीत पाणी उठून दिसतंय, या बाटल्यांना पिचकारीच्या तोंडासारखं निमुळतं होत गेलेलं झाकण लावलंय. वेगळ्या ठेवण्यात आलेल्या काही बाटल्यांमध्ये जेलीपेक्षा जरासा पातळ असा रंगीत पदार्थ भरून ठेवलाय,या बाटल्यांना मात्र नेहमीचंच साधं झाकण बसवण्यात आलंय. एका बाजूला लाकडी काड्या रबरबॅंडच्या सहाय्याने एकत्र बांधून ठेवल्यात. खाली कितीतरी ठिकाणी फाटलेलं लालभडक रंगाचं प्लॅस्टिक अंथरलंय. काही ठिकाणी ते इतकं फाटलंय की त्यातून खालचं झिजलेलं लाकूड स्पष्ट दिसतंय. उग्र पण सुवासिक उदबत्तीचा गंध गाडीच्या आसपास दरवळतोय, आत दोन-तीन देवांच्या तसबिरी टांगल्यात, बाहेरून ठोकण्यात आलेल्या खिळ्यांवर मळकी फडके लटकताहेत. गाडीच्या दर्शनी भागावर त्याच्यावरच ठेवलेल्या बाटल्यांमधील पाण्यालाही लाजवील इतकं सुरेख आणि भरपूर रंगकाम केलंय, त्यावर मोठ्या अक्षरांत लिहिलंय –“आईसगोला” आणि खाली कोपऱ्यात किंमती लिहिल्यात- “1रु. 2रु. 5रु, 10रु.(जंबो)”.

आमच्या शाळेसमोर अशी एक आईसगोल्याची गाडी नेहमी उभी असायची. “आईसगोला चांगला नसतो”, “तिथे वापरतात तो बर्फ खराब झालेला असतो”, “रंगीत पाणी घाण, शिळं असतं”, “आईसगोला खाल्ल्यामुळे गालफुगी होते” इतकी भीती कमी म्हणून की काय पण विचित्र आजारांची नावं सांगून आम्हांला घाबरवलं जाई. हे झालं घरात परंतु शाळेत बाईंना गोळ्याविषयी कळालं की मार तर ठरलेलाच असे. मधल्या सुट्टीत पोरं शाळेच्या गेटबाहेर पडत. गोळ्या, बिस्किट्स, अप्पू, गोड सोप, स्टीकर्स, मुरकुल(बॉबी), तिखट-मीठ लावलेली बोरं, भेळ, कोल्ड्रिंक्सच्या रिकाम्या बाटल्यांतून मिळणारी केशरी, पोपटी रंगाची सरबतं अशा कित्येक खाण्या-पिणाच्या वस्तू सोडून आमची नजर जाई ते आईसगोल्याच्या गाड्याकडे. त्या बाटल्यांतून दिसायचं गडद चॉकलेटी रंगाचं कालाखट्टा, केशरी रंगाचं ऑरेन्ज, हिरव्या रंगाचं खट्टा आम, पिवळ्या रंगाचं पाइनॅपल, लाल रंगाचं रोज... जितके वेगळे रंग तितकीच वेगळी त्यांची चव! “एवढे सुंदर रंग वाईट कसे असू शकतील?”, “एक रुपयाच्या गोळ्याने आपण असे किती आजारी पडणार आहोत?”, “शाळेत गोळा खाल्लाय हे घरी थोडंच कळणार आहे” या प्रश्नांना मनातून सकारात्मक उत्तरे मिळताच (आणि ती मिळतंच!) आपोआपच त्या आईसगोला बनवणाऱ्या मामांच्या हातात एक रुपया टेकवला जाई.

गाड्यावरच्या लोखंडी यंत्राचं हॅंडल फिरवताच पांढराशुभ्र भुसभुशीत बर्फ खाली पडे. बाजुला ठेवलेल्या काड्यांपैकी एका काडीचं वाकवलेलं एक टोक त्या ‘ताज्या’ बर्फात घुसवलं जायचं. मग त्यावर कापडाने दाब देऊन अंडाकृती आकार बनवल्या जायचा. दोन्ही तळहातांमध्ये ठेवलेली ती काडी फिरविताच त्याच्या खाली लावलेल्या गोळ्याचे शिंतोडे चेहऱ्यावर उडत. यानंतर खरी गंमत सुरु होई. आपल्या आवडीच्या रंगांची फर्माईश केली जाई. हिरव्या-लाल रंगाचा जेलीसारखा रस बाटलीच्या बाहेर येत असतानाच गोळा फिरवल्यामुळे त्याची सुंदर नक्षी तयार होत असे. “थोडा लाल टाका, थोडा ऑरेंज डालो, कालाखट्टा” या आमच्या मागण्या गोळा बनवणाऱ्या मामांच्या मूडनुसार किंवा आमच्या नशीबानुसार पूर्ण होत! अखेर अनंतकाळाच्या प्रतीक्षेनंतर रंगांची आणि चवींची सरमिसळ झालेला तो आईसगोला आमच्या हातात येई. गोळा हातात येताच मित्राला मिळालेल्या गोळ्याचा रंगांशी तुलना केली जायची, एखादे सर किंवा बाई बघत नाहीयेत याची खात्री केली जायची आणि त्यानंतरच बाजूला उभ्या असणाऱ्या मोठ्या मुलांच्या हातातील पाच रुपयांच्या आईसगोल्याकडे हेव्याने पाहत आपला आईसगोला तोंडाला लावण्यात जी मजा येई ती अमृतप्राशन करताना देवांनाही आली नसेल बहुदा! गोळा संपत येताच मामाला त्यावर थोडासा रंग टाकून देण्याची विनंती केली जायची. अर्थात त्यालाही मूडनुसारच प्रतिसाद मिळे. “एका रुपयात किती रंग खातो बे” अशी बोलणीही कधीकधी खावी लागत पण त्यानंतर पडणारा रंग जास्त महत्वाचा असे.

एकदाचा गोळा खाऊन संपला की आठवण येई येणाऱ्या तासाच्या बाईंची! एव्हाना आईसगोल्याने त्याचे काम चोख बजावलेलं असे. त्यावर प्रेमाने पसरलेला रंग आमच्या ओठांवर आणि जिभेवरही तितक्याच प्रेमाने पसरत असे. मघाशी बाटल्यांत पाहिलेले रंग आता आमच्या ओठांवर बघून मजा येई. पूर्ण लाल रंगाचा गोळा खाणारा मित्र जास्त टेन्शनमध्ये असायचा कारण केशरी, काळा, पिवळा रंग पाण्याचे दोन-तीन गुळणे करताच निघून जायचे परंतु लाल रंग सहजासहजी निघत नसे. मग लालभडक ओठ हातांनी झाकत येणारा तास ढकलला जाई त्यातही त्याला बाईंनी एखादा प्रश्न विचारला की झालं कल्याण! रंग काढण्यासाठी रुमालाचा वापर निषिद्ध मानला जायचा (कारण घरी कळण्याची भीती!). हे सगळं झालं ते बाईंचा मार चुकवण्यासाठी परंतु गोळा खाताना खूप प्रयत्न करून, झाडामागे लपून,पाठमोरा होऊनही सरांनी किंवा बाईंनी बघितलं असेल तर त्यांचा तास उलटून जाईपर्यंत त्या गोळ्याची चव जिभेवर रेंगाळत राहण्याची आणि हातावरचे छडीचे वळ घरी जाईपर्यंत न मिटण्याची खात्री देता येत असे.

कधीकधी आपल्या शर्टालाही आईसगोला खाण्याची इच्छा होती हे बदामी रंगाच्या शर्टावर छान रंगीत डाग दिसल्यावर कळे. काहीवेळेला तो दाग इतका मोठा असायचा की त्याला खालून रेष ओढली तर तो हुबेहूब आईसगोलाच दिसला असता. ‘दाग अच्छे है’ म्हणण्याची तेव्हा हिम्मत नव्हती(आत्ताही नाही!). अशावेळी मात्र बाई आणि आई दोघींनाही कळण्याच्या भीतीने डबल टेन्शन येत असे पण आमच्यातल्या काही ‘अनुभवी’ पोरांनी त्यावरही उपाय शोधून काढला होता, डाग पडलेल्या ठिकाणी खडू घासायचा! तेही अपूरं पडत असेल तर त्यावर निळ्या शाईचे दोन थेंब टाकून त्यावरून खडू घासला जायचा. “शाई उडाली” हे उत्तर दिल्यावर खावी लागणारी बोलणी, मारापेक्षा नक्कीच परवडणारी असायची. सुदैवाने अशी वेळ फार क्वचित यायची, पहिलाच उपाय बहुतेकवेळा पुरेसा ठरत असे. परीक्षेच्या शेवटच्या दिवशी धमाल असायची. घरी आईसगोला खाण्याविषयी जाहीररीत्या सांगितलं जायचं पण पाच रुपयाचा गोळा हवे तितके रंग टाकूनही गोड लागायचा नाही कारण त्यादिवशी सारेच मित्र पाच रुपयाचा गोळा खायचे आणि मोठी मुले दहा रुपयांचा! उन्हाळ्याच्या सुट्यांत फ्रीजरमध्ये जमा झालेला बर्फ चमच्याने खरवडून त्यात रसना टाकून ऑरेंज फ्लेवरचा आईसगोला तयार करण्याचा प्रयत्न करण्यात यायचा परंतु मामांसारखा जमायचा नाही.

यथावकाश आम्ही मोठे झालो, आवडीनिवडी बदलल्या पण गाड्यावरचे रंग आणि गोळा बनवणारे मामा मात्र तेच राहिले. नंतर शाळेतच कॅन्टीन निघाली आणि गेटबाहेर जाण्यावर बंधनं आली तेव्हाही मामा पोरांची वाट बघत गेटबाहेर उभे राहिल्याचे दिसायचे. परीक्षेच्या शेवटच्या दिवशी मात्र सर्वजण आईसगोला खायचेच. शाळा संपली तशी गोळ्याची उरलीसुरली सवयही सुटली, नंतर कधी गोळा फारसा खाण्यात आलाच नाही. आंम्ही मोठे झाल्यामुळे असेल कदाचित पण आईसगोला दिसल्यानंतर आम्हालाही त्या बर्फाबद्दल आणि तिथे वापरण्यात येणाऱ्या रंगांबद्दल शंका यायला लागली...

इथे कंपनीत नुकताच आईसगोल्याचा एक स्टॉल लागला आहे पण इथे बर्फाचा भुगा करणारी हॅंडलवाली मशीन नाही इथे बारीक केलेला बर्फ तयारच आहे. गोळा तयार करणाऱ्या मामांच्या डोक्यावर टोपी आहे, हातात प्लॅस्टिकचे ग्लोव्हज आहेत (Hygenic Food Norms!). बर्फाचा भुगा स्टीलच्या ग्लासात भरून त्यात काडी खोचली जाते, रंग शर्टावर सांडू नये म्हणून प्लॅस्टिकचा ग्लास दिल्या जातो, रंग टाकून घेण्यासाठी मरमर करावी लागत नाही. या सर्व सोयींसाठी २०रु.ही मोजावे लागतात! पण या आईसगोल्यावरचा रंग जिभेवर उतरत असतानाच अचानक शाळेसमोरचे मामा आठवतात, डागावर लावलेला खडू आठवतो, आईची बोलणी आठवतात आणि या सर्वांत वेगळा दिसू लागतो तो रंगांनी आणि आठवणींनी अधिकच गडद झालेला 1रु.चा आईसगोला!!!









No comments:

Post a Comment