Tuesday, January 11, 2011

बंडू आणि अंकल

       बंडूला ऑफिसला निघण्यासाठी आज जरा उशीरच झाला होता. दाराला कुलूप लावून पायऱ्या उतरत असताना त्याच्या लक्षात आलं की आयकार्ड आणि रुमाल घरातच राहिलाय. हे बंडूला नवीन नव्हतं. 'पेरूचा पापा'(पेन-रुमाल-चावी-पाकीट-पास) हे सूत्र लक्षात ठेवून सुद्धा बऱ्याच वेळेस स्वतःच्या विचारांच्या तंद्रीत असल्यामुळे तो पाकीट घेई पण त्याच्या बाजूलाच असलेलं आयकार्ड विसरून जाई. आजसुद्धा बहुदा तसंच झालं असावं. विसरलेल्या वस्तू घेऊन पुन्हा कुलूप लावत असतानाच त्याला समोरच्या दारातून बाहेर पडणारे गृहस्थ दिसले. "आंटीचा नवरा दिसतोय" तो मनातल्या मनात बोलला. परराज्यात असल्यामुळे जुजबी ओळख असलेल्यांना काका-काकू ऐवजी अंकल-आंटी म्हणण्याची त्याला सवय झाली होती. बंडू आणि त्याच्या रूममेट्सचं आंटीशी सोसायटीचं मेन्टेनन्स, लाईट बिल वरून बऱ्याचदा बोलणं होई. खरं म्हणजे बोलणं कमी आणि वाद जास्त असे. पण तरीही त्यांच्याशी कधीतरी अशाच गप्पाही होत आणि पुजेचा प्रसादही मिळे. पण बंडूची अंकलशी कधी भेट झाली नव्हती ना बोलणं. त्यांना 'good morning' म्हणावं असं त्याला वाटलं परंतु पुढच्याच क्षणी त्याच्या मनानं अडवलं- "काय करायचंय 'good morning' म्हणून?" आता 'good morning' म्हणून कुणाला काय करायचं असतं? आपल्या घरासमोर राहतात म्हणून औपचारिक अभिवादनाची पद्धत, पण या प्रश्नामागे पार्श्वभूमी होती. मागच्याच महिन्यात मेन्टेनन्सचे पैसे जास्त मागत असल्याच्या कारणावरून बंडू आणि त्याच्या रूममेट्सचं आंटीशी वाजलं होतं. गंभीर भांडणं नव्हती, आपल्याकडच्या सोसायट्यांत होतो तसा वाद झाला होता. तेव्हा 'ही समोरची पोरं फार बदमाश आहेत. मेन्टेनन्सचे पैसे बुडवतात' असं काहीसं आंटींनी त्यांच्या नवऱ्याला सांगितलं असावं असं बंडूला वाटलं. आधीच खराब असलेलं impression अजून खराब करून घेण्यात काही अर्थ नव्हता.
       एव्हाना बंडूच्या विचारांच्या एक्स्प्रेसने वेग घेतला होता. आज पहिल्यांदाच तो अंकलला इतक्या जवळून पाहत होता. पन्नाशीच्या आसपासचं वय, इन न केलेला पंधरा शर्ट, काळी पॅन्ट, पायात अंगठ्याच्या चपला, कामावर जाताना कुठल्याही मध्यमवर्गीयांच्या चेहऱ्यावर उमटतात तसे निर्विकार, काहीसे त्रासलेले भाव... "यांची बायको किती चलाख आणि हे किती साधे" तो विचार करत होता. फारशी ओळख नसलेल्यांना स्वतःच्या विचारांमध्ये चलाख, साधा, सज्जन, भांडकुदळ अशी विशेषणे लावायला काही हरकत नसते :-) "खरंच काय करायचंय अंकलला 'good morning' म्हणून?" त्याने प्रश्न निकालात काढला. प्रश्नाला प्रश्नानेच उत्तर देण्याची त्याची जुनी सवय होती!
       पायऱ्या उतरून तो खाली आला आणि गेटमधून बाहेर पडला. आज उशीर झाल्यामुळे नेहमीच्या स्टॅंडवर रिक्षा मिळणार नाही तर मेनरोडपर्यंत चालत जावं लागेल हे लक्षात येताच त्याने चालण्याचा वेग वाढवला. १५-२० पावले चालतो ना चालतो तोच अचानक मोटारसायकलवर बसलेले अंकल त्याच्या बाजूला येऊन थांबले. "I am going till main road, I will drop you" अंकलच्या या बोलण्याने बंडू उडालाच! ज्या माणसाबद्दल आपण इतका वेळ विचार करत होतो तो आपल्याला लिफ्ट देईल याचा त्याने विचारही केला नव्हता. "Thanks Uncle but I will get an auto". ऑटो लवकर मिळणार नाही हे माहित असूनसुध्दा केवळ औपचारिकता म्हणून त्याने उत्तर दिलं. "Come Come" अंकलनी पाठीमागच्या रिकाम्या सीटवर हात मारत त्याला बसण्याचा आग्रह केला.
"आपल्याला ओळखतही नसलेल्या अंकलने लिफ्ट का दिली असावी?, कदाचित आपला फॉर्मल ड्रेस, शूज, टाय पाहून अंकलवर impression पडलं असावं, बहुदा आंटींनी आपल्याबद्दल त्यांना काहीही वाईट सांगितलं नसावं, आपण किती वेडे आहोत, कुठल्याही गोष्टीचा किती विचार करत बसतो, सकाळी त्यांना 'good morning' म्हणालो असतो तर काय बिघडलं असतं?" (इथेही प्रश्नच!). त्याचे विचार सुसाट गतीने धावत असतानाच त्यांना अचानक ब्रेक लागला. अंकलनी मेनरोडवरच्या रिक्षा स्टॅंडवर गाडी थांबवली होती.
       "Thanks Uncle" हे दोनच शब्द बंडूच्या तोंडून बाहेर पडले. मनात मात्र विचारांनी गर्दी केली होती...!

ता. क. : यातला बंडू म्हणजे मी स्वतः आहे! आपल्या स्वतःशी घडलेल्या घटना तृतीयपुरुषी एकवचनात लिहिल्या तर त्यात जास्त तटस्थता येते असं मला वाटतं. हे योग्य नसेल कदाचित पण स्वतःबद्दल फार तटस्थतेने लिहिणं मला अजून चांगलं जमत नाही त्यात कुठेतरी 'soft corner' यायला लागतो म्हणूनच ही तृतीयपुरुष एकवचनाची सोय!

No comments:

Post a Comment