नवीन पुस्तक दिसताच सर्वांत आधी मी पानांचा वास घ्यायचो. डोळे बंद
करून पुस्तक नाकाजवळ नेताना मला पुस्तकातलं एकही चित्र पाहायची किंवा एकही पान
वाचायची इच्छा नसायची. नंतरचा बराच वेळ पुस्तकातली चित्रे बघण्यात निघून जाई. गडद
रंगातली ती चित्रं, प्राण्यांचे-विशेषतः छोट्या अस्वलांचे गोंडस चेहरे,
मोठ्या माणसांच्या मिशा, म्हाताऱ्या आजोबांची
दाढी, टेकडीवर जाऊन ढगांचे आकार बघत बसणारी मुलं, लहान मुलांचे रंगबिरंगी कपडे, बूट, सुटाबूटातला कोंबडा. याचबरोबर घरातल्या झाडूपासून ते राजवाडातल्या उंची
मद्याच्या पेल्यापर्यंत सार्या वस्तुंची चित्रेही अगदी सहज डोळ्यासमोरुन तरळून
जाताहेत... छोटी, उबदार घरं,
धुराड्यातून निघणारा धूर, हिरवीगार कुंपणं,
डोंगर, दर्या, नद्या...
बाहेर बर्फ भुरभुरत असल्याने घरात रजई घेउन गाढ झोपलेला छोटा मुलगा, घरात रात्री लावलेल्या दिव्याचा मंद प्रकाश पसरलाय, खिडकीतून
बाहेर उभा असलेला कुत्रा दिसतोय. अशी चित्रे पाहिल्यावर मलाही तिथे जावंसं वाटे.
चित्रे पाहून झाल्यानंतर वेळ येई पुस्तक वाचण्याची. पांढर्याशुभ्र कॅनवाससारख्या
पेपरवरची गडद रंगांतील चित्रे आणि त्याखाली काळ्या शाईतल्या काही ओळी... पुस्तक
हिंदीत असेल तर बाबांकडून नाहीतर मावशीकडून त्याचं मराठीत भाषांतर करवून घ्यायचं.
खूप मजा यायची वाचताना. बहुतेकवेळा बाबाच त्यातल्या गोष्टी वाचून दाखवत, तेही एका विशिष्ट तर्हेने. नाटकातली माणसं जशी बोलतात तसं. बाबांच्या तशा
वाचण्यामुळेच काही वाक्यं अजूनही आठवतात... "मासा आज्ञा देतो, माझी इच्छा आहे. चुलाण्या तू
घरातून निघ आणि थेट झारच्या दरबारात मला घेउन जा", "खांद्यावर तलवार टाकून डौलत कोंबडा येतो, टोपी
शिवायला कोल्हीची खांडोळी करायला येतो. कोल्हीताई सांभाळ बाहेर ये"(कोल्हीला मारायला निघालेला कोंबडा तिला ’ताई’ म्हणत बाहेर यायचं आव्हान
देतो आहे!!), "मी सुध्दा तिथे
होतो. मध,बीयर प्यालो. मिशांतून थेंब गळाले पण तोंडात एकही
थेंब पडला नाही", "ढगांच्या गडगडाटाला आणि
विजांच्या चमचमाटाला मी भीत नाही", "मैं दादासे बच
निकला।मैं दादीसे बच निकला।खरहे को भी नही मिला।नही भेडिये मैं भालू को भी नही
मिला।तुझसे सुन ओ लोमडी, बचना मुश्किल क्या भला?"(हे शेवटचं गाणं तर घरातून पळून गेलेली एक ’पुरी’ गात असते!!), "म्याऊ म्याऊ।ठीक है ठीक।"...
बापरे! ही वाक्यं आठवून आता खूप हसू येतंय पण अशा वाक्यांनीच माझं
बालपण किती श्रीमंत केलं होतं तेही आत्ताच समजतंय.
यातल्या येमेल्याची गोष्ट वाचून मी आळशी झालो नाही. बीयर पिणार्या
आजोबांचं चित्र पाहून मला कधी बीयर पिण्याची इच्छा झाली नाही. कोल्हीची खांडोळी
करायला निघालेल्या कोंबड्याने मला हिंस्त्र बनवलं नाही. या पुस्तकांतून इसापनिती, पंचतंत्रासारखे उपदेश नसायचे. उलट पार्ट्यांमधून नाचणारी, मध,बीयर पिणारी पात्रे होती. माशाच्या सहाय्याने
झारच्या मुलीला पटवणारा येमेल्या होता, मदतीच्या वेळी पळून
जाणारी, उपकार विसरणारी कृतघ्न, कपटी
माणसे होती, शाळा बुडवून टेकडीवर फिरायला जाणारे मित्र होते,
आई-बाबांचं न ऐकता गावभर उनाडक्या करत फिरणारं अस्वलाचं पिल्लू
होतं... एकाप्रकारे लहान वयात मुलांवर जे संस्कार करावे म्हणतात तसं या पुस्तकात
फारसं काही नसायचं. या पुस्तकांची निर्मीतीच छोट्यांचं मनोरंजन करण्यासाठी,
त्यांना आनंद देण्यासाठी आणि मुख्यत: त्यांना वाचनाची गोडी
लावण्यासाठी करण्यात आली असावी. यासाठी त्यांना बोजड उपदेश कथांचा आधार घ्यावा
लागला नाही. अर्थात सारीच पुस्तके अशी नव्ह्ती. खगोलशास्त्र, जहाजं, जंगलांची माहिती देणारी पुस्तकेही होती.
नातवाला चिनार वृक्षाची गोष्ट सांगणारे आजोबा होते, फुलदाणी
फुटल्याचं खरं कारण आईला सांगत असतानाच डोळ्यांत टचकन पाणी येणारा पेत्रिक होता,
अंधार्या रात्री जंगलात वाट चुकलेल्या वर्गमैत्रिणीला धीर देणारा
मित्र होता, धूर्त व्यापार्याला पकडून देणारा मुलगा होता.
हे सारं असतानाही इसापनितीच्या ५०१ गोष्टींच्या पुस्तकाप्रमाणे, प्रत्येक गोष्ट संपल्यासंपल्या त्याखाली ’तात्पर्य:.............’ अशी ओळ
मला या पुस्तकांमधून कधीही दिसली नाही.
आठ-दहा वर्षांपर्यंत म्हणजे माझ्या लहान भावाने काळ्या-निळ्या
रंगांचे पेन घेऊन त्या मुंगीच्या पाठीवर तिच्यापेक्षा पाचपट मोठा लाडू किंवा डोंगर
काढेपर्यंत तसेच गवतावर पहुडलेल्या शेतकर्याची पांढरी दाढी काळी करेपर्यंत आणि
त्याच्यातल्या भावी चित्रकाराची जाणीव मला होईपर्यंत बर्याच पुस्तकांची पाने
कॅनवास म्हणून कामी आली होती! एखादा संशोधक ज्या तळमळीने आणि मरमर करत जुन्या
वस्तू जपण्याचा प्रयत्न करत असतो तशीच माझी अवस्था झाली होती. लहान भावाला
’हाताचा’ प्रसाद दिल्यानंतर त्याचा हात पोहोचणार नाही अशा उंच ठिकाणी मी उरलेली
पुस्तके ठेवुन दिली आणि त्यांची तब्येत आजही छान आहे!
’रादुगा’ या रशियन शब्दाचा अर्थ आहे ’इंद्रधनुष्य’.
माझं बालपण या पुस्तकांनी खरोखरच इंद्रधनुष्यासारखं रंगबिरंगी आणि सुंदर बनवलं
होतं. या पुस्तकांनी मला काय दिलंय हे मलाही पूर्ण कळालेलं नाही. लहानपणीच्या या
खर्या मित्रांबद्दलची कृतज्ञता अशा काही ओळी लिहून व्यक्त करणे शक्य नाही...
आता ती पुस्तकं हातात घेऊन मी पुन्हा त्या पानांचा वास घेतोय.
त्यांना आधीसारखा वास येत नाहीये तर जुनाट पानांना येतो तसा काहीसा कुबट वास
येतोय. पण मला हा वासही तितकाच हवाहवासा वाटतोय. खूप दिवसांनी जुन्या मित्रांना
भेटल्याचा आनंद होतोय. ही पुस्तके कदाचित आपल्याला विसरली असावीत असा विचार मनात
येताच... एकेक पुस्तक अलगद उघडलं जातंय. येमेल्या पुन्हा माशाला आज्ञा करु लागलाय, पेत्रिक आईसमोर रडतोय, सहलीला आलेल्या मुलांना बाई
गोष्ट सांगताहेत, म्हातारा त्याची हिरे देणारी बकरी शोधतोय,
मुंगळा घाईघाईने घरी परतलाय, खांद्यावर तलवार
टाकून डौलात येणार्या कोंबड्याला घाबरून कोल्ही जोरात पळतीये, टेकडीवरच्या त्या ढगात आला मलाही विचित्र आकार दिसताहेत, घरातून पळालेल्या पुरीच्या मुर्खपणामुळे एक लांडगिणीने तिला खाऊन टाकलंय,
रात्रीच्या वेळी शांत झोपलेल्या घरांच्या खिडक्या, रस्ते पिवळट-सोनेरी रंगांनी न्हाऊन गेल्यात त्यामुळे रात्रीच्या अंधाराला
सोनेरी साज चढलाय आणि अंगणातला चिनार, आजोबांची गोष्ट ऐकून
पुन्हा एकदा तृप्त झालाय...
"माझं बालपण या पुस्तकांनी खरोखरच इंद्रधनुष्यासारखं रंगबिरंगी आणि सुंदर बनवलं होतं. या पुस्तकांनी मला काय दिलंय हे मलाही पूर्ण कळालेलं नाही. लहानपणीच्या या खर्या मित्रांबद्दलची कृतज्ञता अशा काही ओळी लिहून व्यक्त करणे शक्य नाही..."
ReplyDelete-------आपने मेरे मुंह कि बात छीन ली..खरेच माझ्या मनात अशाच भावना आहेत..झुबेवास्की बुलेवार्द अश्या नावाचे प्रकाशन होते,त्यामध्ये खूप सुंदर गोष्टीची पुस्तके माझी आई आणायची. "छोटा इवान,बुद्धीने मोठा','छोटुकली हावरोचेश्का' ;बाबा यागा','एक पायावरचे कोंबडीचे घर','खरपूस भाजलेला बैल' असली व्यक्तिचित्रे वाचून प्रचंड करमणूक व्हायची!!
छान लेख!!
धन्यवाद सिद्धार्थ!
ReplyDeleteरशियन भाषांतली पुस्तके मराठीत भाषांतरित करण्याचा प्रकल्प मध्येच का बंद करण्यात आला ते कळलं नाही... Those books were really enchanting.
While USSR was in existence, the Soviet government provided funding for translation in various languages. After the collapse of USSR, this government funding stopped abruptly and the era of Russian books translated in Marathi came to an end. (Except for the occasional book translated by Indian publishers)
DeleteChingiz aitmatov likhit - Anil Awaldar Anuwadak
ReplyDelete''teen Kadambarika''(Lal rumalatla chinar,Dharanimata, dueeshen master etc.)
ya pustkachya shodhat aahe geli 10 varshe!
Kunakae aslyas/mahit zalyas nakki Sampark karava!
- sanjay pandurang pawar
267 dattawadi pune 411030.
mobile no. 9325132133
इथे पहा
ReplyDeletehttps://www.facebook.com/SovietLiteratureInMarathi
https://docs.google.com/folder/d/0B6QdKq6q5WvFYldoNVFoakRSS0k/edit?pli=1
खूप दिवसांनी हवेहवेसे काहीतरी वाचायला मिळाले. खूपच छान
ReplyDelete