Wednesday, December 22, 2010

अबाऊट एली (About Elly / Darbareye Elly)

images

कल्पना करा की आपण आपल्या मित्र मैत्रीणींबरोबर एका सहलीला आलो आहोत. आपल्या group मध्ये एक आमंत्रित व्यक्ती आहे जी कोण्या एकाच्या ओळखीची आहे. ती व्यक्ती group मधल्या इतर कोणालाही ओळखत नाही. हळूहळू ती व्यक्ती आपल्यात मिसळू लागते, तिला बोलवण्यामागचं कारण समजल्यावर आपण सुद्धा तिच्याशी मोकळेपणाने वागू लागतो, ती आपल्यापैकीच एक बनून जाते. एक दिवस उलटून जातो, सर्वकाही व्यवस्थित सुरु असतानाच अचानक ती व्यक्ती गायब होते... कुणालाही तिच्याबद्दल काहीही माहिती नसतं. आपण तिला शोधण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतो पण व्यर्थ! यादरम्यान त्या व्यक्तीबाबतच्या अनेक बाबी प्रकाशात येत जातात ज्यामुळे सारेच अचंबित होतात. सुरुवातीला आपलेपणाने, जीवाच्या आकांताने त्या व्यक्तीचा शोध घेणारे आपण नंतर केवळ एका त्रयस्थ दृष्टीकोनातून, आपल्या मागे पोलीसांचा ससेमिरा लागू नये या भावनेतून शोध मोहीम सुरु ठेवतो... या साऱ्या घटनाक्रमात सर्वांत जास्त मानसिक कुचंबणा होते त्याची ज्याने या व्यक्तीला आमंत्रित केलेलं असतं... ती सापडत नसल्याचं दु:ख आणि आपल्यामुळे बाकीच्यांना झालेला त्रास यामुळे ती कोलमडून गेलेली असते. शेवटी आपण विचार केलेल्या अनेक शक्यतांपैकी एक खरी ठरते आणि त्या व्यक्तीचा शोध घेणे संपते...

       इराणी दिग्दर्शक असघर फरहादी यांचा 'About Elly' (Darbareye Elly) हा चित्रपट आपल्याला अशाच एका सहलीवर घेऊन जातो, आपणही नकळत त्या सहलीचा एक भाग बनून आपल्या शक्यतांच्या कसोटीवर Elly ला शोधत राहतो. तीन इराणी जोडपे (सेपीदा-आमीर, शोहरे-पेमन, नाझी-मनूचेहेर), त्यांची तीन मुले, जर्मनीहून परतलेला एक घटस्फोटीत मित्र (अहमद), सेपीदाच्या मुलीला शिकवणारी शिक्षिका (एली) आणि स्वतःला एलीचा भाऊ म्हणवणारा अलीरझा या व्यक्तीरेखांभोवती ही कथा फिरते. सुरुवातीला काही वेळ बोगद्यातून जाणारी कार आणि तीत ओरडणारी मुलं, बायका दिसत राहतात. एके ठिकाणी थांबल्यावर सेपिदा बाकीच्यांना एलीची ओळख करून देते. अहमद आणि एलीने एकमेकांना पसंद करावं असा तिचा हेतू असतो, इतर सारेजण मग याच दृष्टीने प्रयत्न करताना दिसतात. त्यांनी बुक केलेलं कॉटेज, त्याचा मालक परत येत असल्यामुळे त्यांना मिळत नाही. शेवटी कॅस्पिअन समुद्राच्या काठी एका साध्या घरात ते राहायचं ठरवतात. बुक केलेलं कॉटेज न मिळाल्यामुळे त्यांचं चिडणं, समुद्रकाठचं घर बघून मुलांच्या काळजीने नवऱ्यावर चिडणारी बायको, मिळालेल्या घराची साफसफाई, रात्रीच्या जेवणाची भांडी दुसऱ्या दिवशी सकाळीच धुऊन टाकू असं बायकांचं एकमेकांना सांगणं त्याचवेळी बाहेर व्हरांड्यात पुरुष मंडळींचं हुक्का पिणं, पत्ते खेळणं या लहानसहान बाबी इतक्या सहजतेने दाखवल्या गेल्यात की हे सारं आपल्याच अवतीभवती चालत असल्यासारखं वाटावं. रात्री dumb charades खेळत असताना आपणही त्यांच्याबरोबर अंदाज बांधू लागतो तेव्हा तर याची खात्रीच पटते.

images1

       दुसऱ्या दिवशी सकाळीच एलीला परत जायचं असतं कारण एलीने तिच्या आईला ती मैत्रीणीबरोबर एक दिवस बाहेर जात आहे असं खोटंच सांगितलेलं असतं आणि सेपिदाला त्याची कल्पना असते तरीही सर्वजण तिला थांबायचा आग्रह करतात आणि नाईलाजाने तिला थांबावं लागतं... बाहेर पुरुषमंडळी Sand Volleyball खेळत असतात, एली समुद्राकाठी खेळणाऱ्या लहान मुलांवर लक्ष ठेवत असते, बायका आपापली कामं करत असतात... तेवढ्यात एक लहान मुलगी रडत रडत आरश पाण्यात पडल्याचं सांगते. घरातलं वातावरण एकदम बदलतं. सारेजण त्याला वाचविण्यासाठी समुद्राकडे धाव घेतात, मदतीला आजूबाजूची काही तरुण पोरं येतात. समुद्राबरोबर वाहत जाणाऱ्या आरशला वाचवण्यात यश येतं पण... या लहान मुलांकडे लक्ष ठेवणारी एली? ती कुठे असते? आधीच थकलेले लोक तिच्या शोधासाठी परत समुद्रात जातात, एक बोट, पाणबुडे यांच्या मदतीने शोधमोहीम सुरु होते पण ती सापडत नाही. यानंतर सुरु होतो शक्याशक्यतांचा खेळ... ती नक्की कुठे गेली? समुद्रात वाहून गेली की कुणालाही न सांगता निघून गेली की कुठे बाहेर गेली... कुणालाच माहिती नसतं. छोट्या मुलीने तिला आरश पाण्यात पडेपर्यंत किनाऱ्यावरच उभी असल्याचं पाहिलं असतं. घरात जेव्हा तिची बॅग आणि मोबाईल सापडत नाही तेव्हा ती न सांगता निघून गेली असेल असं सर्वांना वाटतं पण सेपिदा एलीची तिने लपवून ठेवलेली बॅग त्यांना दाखवते(त्यातच तिला मोबाईल असतो) आणि क्षणभरापूर्वीचा आशेचा किरण लगेचच दिसेनासा होतो.

       यानंतर एकेक सत्य बाहेर येत जातं आणि एलीबद्दल वाटणारा आपलेपणा तिरस्कारात बदलू लागतो, तिला शोधण्यापेक्षा पोलिसांपासून कसं दूर राहायचं याचा विचार ते करू लागतात कारण ती जिवंत असण्याची आशा ते सोडून देतात. अखेर एलीचा भाऊ अलीरझाला बोलावण्यात येतं आणि शेवटचं भयंकर सत्य समोर येतं...

       वरकरणी पाहता ही रहस्यकथा वाटते आणि काहीअंशी ती आहेही परंतू चित्रपटाचा बाज रहस्यपटाकडे झुकणारा अजिबात नाही. त्यात पूर्णपणे भर दिल्या गेलाय तो भावनिक नात्यांवर आणि गुंतागुंतीवर. आतापर्यंत पाहिलेल्या इराणी चित्रपटांचं एक वैशिट्य जाणवतं की त्यात कृत्रिमपणाचा लवलेशही नव्हता त्यामुळे आपण चित्रपटाशी बांधले जातो. संपूर्ण चित्रपटात एकदाही पार्श्वसंगीत वापरलेलं नाही. अगदी आरश आणि एलीचा समुद्रात शोध सुरु असतानाच्या दृश्यातही समुद्राच्या लाटांशिवाय इतर कोणतंही संगीत नाही यामुळे समोरचं दृश्य अधिक परिणामकारक ठरतं. या चित्रपटातील काही scenes प्रत्यक्ष बघायलाच हवेत जसे एली लहान मुलांशी किनाऱ्यावर खेळत असते ते दृश्य, एलीची बॅग दिसत नाही म्हणल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर झळकलेलं क्षणिक समाधान (a ray of hope हा चपखल बसणारा शब्द), एलीच्या एकाएकी नाहीशी होण्याबद्दलचे सर्वांचे तर्कवितर्क, सेपिदावर चिडून तिला मारहाण करणारा तिचा नवरा, "कुणी काहीही विचारलं तरी आम्हांला माहिती नाही असे सांगा" म्हणणारे आणि त्याची मुलांकडून practice करवून घेणारे आई-बाबा, एलीबद्दलची सत्ये उलगडत असतांनाची अह्मदची स्थिती, एलीच्या मृत्यूनंतर तरी तिच्याबद्दल खोटे बोलू नये असे वाटणारी सेपिदा आणि तिच्या खोटे न बोलल्यामुळे बाकीचे कसे अडचणीत येतील हे पटवून सांगणारे इतर, या मानसिक द्वंद्वात शेवटी असहाय्य होऊन रडणारी आणि अखेर खोटं बोलणारी सेपिदा...

       हा चित्रपट संपल्यावर काही गोष्टी प्रामुख्याने लक्षात राहतात: दिग्दर्शन, निर्माण, कथा, पटकथा, वेशभूषा अशा विविध कामगिरी एकहाती पार पाडणारे असघर फरहादी, सेपिदाची भूमिका करणारी गोलशिफ्तेह फराहनी (Golshifteh Farahani), चित्रपटाची श्रेयनामावली दिसत असताना ऐकू येणारं वायोलिन... 'Song for Eli' ही Andrea Bauer ची वायोलिनवरची धून. चित्रपटाइतकाच खोल परिणाम हे instrumental करतं. संपूर्ण चित्रपट सलग पाहिला असल्यास याचा अनुभव नक्कीच येईल. या चित्रपटाच्या कथेचा विचार करता याचं नाव 'About Elly' पेक्षा 'About a Lie' ठेवावं असही काहीजणांनी सुचवलं होतं. या चित्रपटाबाबत फरहादी म्हणतात, "A film must open a space in which the public can involve themselves in a personal reflection, and evolve from consumers to independent thinkers. Cinema has no other choice but to take up this approach, as I did when I made 'About Elly' ". हा चित्रपट या कसोटीवर नक्कीच उत्तीर्ण होतो!

13675-about-elly

1 comment: