गानसरस्वती स्व. किशोरी आमोणकर यांनी भारतीय शास्त्रीय संगीत परंपरेला श्रीमंत केलेले आहेच परंतु त्याचबरोबर संत साहित्याची चैतन्यानुभूतीही त्यांनी श्रोत्यांपर्यंत आणून ठेवली आहे. पं. कुमार गंधर्वांप्रमाणे संतसाहित्याचा सर्वार्थाने अभ्यास करून त्यांनी संत ज्ञानेश्वर, संत जनाबाई, संत एकनाथ, संत तुकाराम, संत सोयराबाई, संत मीराबाई यांच्या रचना श्रोत्यांपर्यंत पोहचवल्या. या रचना ऐकणाऱ्या प्रत्येकाला रचनाकाराची परमेश्वराशी एकरूप होण्याची धडपड समजून घेता येते. संत ज्ञानेश्वरांची अशीच एक रचना “जाणे अज मी अजर” किशोरी आमोणकरांनी गायलेली आहे. यात कुठलेही वाद्यसंयोजन नाही. आहे तो केवळ किशोरीताईंचा धीरगंभीर आवाज आणि त्यास तंबोऱ्याची साथ. या द्वयीतून साकारले गेलेले नादविश्व इतके अलौकिक आणि दैवी आहे की ऐकणाऱ्यांना ‘ब्रह्मानंदी टाळी’ लागण्याचा दुर्लभ अनुभव क्षणभर का होईना नक्कीच मिळतो.
वयाच्या एकविसाव्या वर्षी संजीवन समाधी घेतलेल्या महायोगी संत ज्ञानेश्वरांनी भगवद्गीता प्राकृत मराठीत शब्दश: न आणता त्यातील भावासहित आणली. म्हणूनच ती ‘भावार्थदीपिका’ - ज्ञानेश्वरी. “जाणे अज मी अजर” या ओवींचे आणखी एक वैशिट्य म्हणजे त्या ज्ञानेश्वरीच्या शेवटच्या, अठराव्या अध्यायात आलेल्या आहेत. ज्ञानेश्वरांनी या अखेरच्या अध्यायास ‘कळसाध्याय’ म्हटले आहे. तो शेवटचा अध्याय आहे म्हणून कळसाध्याय नव्हे तर मंदिराचा कळस जसा दुरून पथदर्शक ठरतो तसा हा गीताप्रासादाचा कळसाध्याय संपूर्ण गीतादर्शनासाठी मार्गदर्शक ठरला आहे.
जी गीतारत्नप्रासादाचा | कळसु अर्थचिंतामणीचा |
सर्व गीतादर्शनाचा | पाढाऊ जो || (ज्ञा. १८-३०)
स्वत:चे शरीर आणि आत्मा यांना पृथक जाणून आत्मा परमात्म्यात विलीन करणे, परब्रह्माशी एकरूप होणे हे भारतीय तत्त्वज्ञानाचे, एकूणच धर्मशास्त्राचे अंतिम ध्येय आहे. हाच ‘मोक्ष’! कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तीयोग या मार्गांवरून चालल्यास मोक्षप्राप्ती होते असे भगवद्गीता सांगते. गीतेच्या अठराव्या अध्यायात (मोक्षसंन्यासयोग) श्रीकृष्ण सांगतात,
भक्त्या मामभिजानाति यावान्यश्चास्मि तत्त्वतः ।
ततो मां तत्त्वतो ज्ञात्वा विशते तदनन्तरम् || (गीता १८-५५)
याचे सर्वसाधारण भाषांतर असे करता येते की, आपल्या भक्तीने परमात्म्याला तो जसा आहे तसाच तत्त्वत: जाणणारा त्यात लगेचच प्रविष्ट होतो.
आता परमात्म्याला तत्वत: जाणणे म्हणजे नक्की काय? परमात्म्याला तत्वत: कसे जाणावे? परमात्मा-परब्रह्म दिसतो कसा? त्याचे स्वरूप काय? तो स्त्री अथवा पुरुष आहे काय? तो किती जुना आहे? तो निर्माण कधी आणि कसा झाला? त्याचा स्वभाव काय? तो नक्की करतो काय? अशा अनेकविध क्लिष्ट प्रश्नांच्या उत्तरासाठी परत ज्ञानेश्वरीच मार्गदर्शक ठरते. ज्ञानेश्वरीतल्या अठराव्या अध्यायातील ११९३ ते १२०० या ओवींमध्ये मुख्यत: ‘मी’ या प्रथमपुरुषी सर्वनामाची विशेषणे आली आहेत. ‘मी’ कोण? तर परमात्मा-परब्रह्म. परंतु परमात्म्याला जाणणारा ‘तो’ (साधक) आणि ‘मी’ (परमात्मा) असा भेद न राहता सरतेशेवटी केवळ ‘मी’च राहतो. येथे शेवटची ओवी संपते.
परमात्मा कसा आहे? त्याला जन्मही नाही आणि जरामरणही नाही. त्याला अंत नाही अन आरंभही नाही. तो अपार आहे, अथांग आहे. तो अरूप-निर्गुण-निराकार आहे. तो अनादी-अनंत-चिरंतन आहे. तो अविनाशी आहे. तो अभय-आधार-आश्रय प्रदान करतो. तो सर्वव्यापक आहे. सहज-सर्वत्र भरून राहिलेला आहे तरीही तो असंग आहे . तो कर्मबंधनातून मुक्त आहे, स्वतंत्र आहे. त्यात भर घालता येत नाही आणि त्यात घटही होत नाही. तो नवीनही आहे आणि जुनाही. तो आद्य आहे आणि अर्वाचीनही. तो शून्य आहे तसेच संपूर्णही. तो सूक्ष्म आहे आणि जडही. व्यक्त आहे आणि अव्यक्तही. परमात्मा अशा टोकाच्या विरोधाभासांनी युक्त आहे कारण त्याच्याकडे भेदाभेद नाही. तो ‘अद्वैत’ आहे. अशा परमात्म्याला जाणणे सोपे नक्कीच नाही. त्यास शब्दश: जाणले. परंतु त्यासाठी कुठला मार्ग अनुसरावा? अनन्यभक्ती! अद्वैतास जाणणारी ‘अद्वयभक्ती’. या अद्वयभक्तीने जो परमात्म्यास जाणू पाहतो तो स्वतच: परब्रह्म-परमात्मा होतो – हाच मोक्ष!
किशोरीताईंनी रागरससिद्धांतावर आधारित ‘स्वरार्थरमणी’ हा ग्रंथ सिद्ध केला आहे. मी ‘ग्रंथ सिद्ध केला आहे’ असे का म्हणत आहे ते ‘स्वरार्थरमणीच्या’ वाचकांना नक्कीच समजले असेल. त्या लिहतात की, “शरीराचे अस्तित्व हे अल्पकाळ टिकणारे, मर्यादित स्वरुपाचे असते. परंतु आत्म्याचे अस्तित्व हे अपरिमित, अमर्याद, निराकार, निरंजन, चिरंतन, स्थिर स्वरुपाचे असते. त्याची फक्त जाणीव वा अनुभूती येऊ शकते. त्याचे आपल्याला ज्ञान होत असते, प्रचिती येत असते. अशा तर्हेची प्रचिती माध्यमातून येणे हे माध्यमाचे पूर्णस्वरूप, अंतिमस्वरूप असते...माध्यमातून आत्मप्रचिती किंवा आत्मसौंदर्याची प्रचिती येणे हे पर्यायाने स्वतःच्या आत्म्याचेच दर्शन वा बोध असतो”. अद्वयभक्ती करण्यासाठी लागणारे माध्यम व्यक्तीपरत्वे भिन्न असू शकते. किशोरी आमोणकरांसाठी हे स्वरमाध्यम आहे. एकदा आत्म्याचा बोध झाला की परमात्म्यात विलीन होण्याची प्रक्रिया सुकर होते. या गानसरस्वतीला हे साध्य झाले यात नवल ते कसले?
जाणे अजु मी अजरु । अक्षयो मी अक्षरु ।
अपूर्वु मी अपारु । आनंदु मी ॥ ११९३ ॥
अचळु मी अच्युतु । अनंतु मी अद्वैतु ।
आद्यु मी अव्यक्तु । व्यक्तुही मी ॥ ११९४ ॥
ईश्य मी ईश्वरु । अनादि मी अमरु ।
अभय मी आधारु । आधेय मी ॥ ११९५ ॥
स्वामी मी सदोदितु । सहजु मी सततु ।
सर्व मी सर्वगतु । सर्वातीतु मी ॥ ११९६ ॥
नवा मी पुराणु । शून्यु मी संपूर्णु ।
स्थूलु मी अणु । जें कांहीं तें मी ॥ ११९७ ॥
अक्रियु मी येकु । असंगु मी अशोकु ।
व्यापु मी व्यापकु । पुरुषोत्तमु मी ॥ ११९८ ॥
अशब्दु मी अश्रोत्रु । अरूपु मी अगोत्रु ।
समु मी स्वतंत्रु । ब्रह्म मी परु ॥ ११९९ ॥
ऐसें आत्मत्वें मज एकातें । इया अद्वयभक्ती जाणोनि निरुतें ।
आणि याही बोधा जाणतें । तेंही मीचि जाणें ॥ १२००॥
- संत ज्ञानेश्वर
हा ब्लॉग ’आठवणीतली गाणी’ या संकेतस्थळाशी जोडण्याबाबत आपल्याशी संपर्क करायचा आहे.
ReplyDeletepls email me - alka.vibhas@gmail.com